Wednesday, September 17, 2008

गणेशोत्सव आणि पर्यावरण - ५


दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांची संख्या वाढते आहे, तसेच त्यात बसवण्यात येणा-या मूर्ती व त्यांची सजावट यांच्या आकारांचाही विस्तार होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे नवनवे पदार्थ, उपकरणे आणि प्रक्रिया यांचे पंख कलाकारांना लाभले असल्यामुळे आपल्या कल्पकतेच्या बळावर ते कलाविश्वात स्वैर भरा-या मारू लागले आहेत. त्यांचे अद्भुत आणि मोहक कलाविष्कार पहातांना कधीकधी भान हरपायला होते. अनंत देव्हा-यांमध्ये आसीन झालेल्या मंगलमूर्तीची कोटी कोटी रूपे यांतून पहायला मिळतातच, शिवाय पौराणिक कथा, ऐतिहासिक प्रसंग व सामाजिक समस्या अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे मनोहर देखावेसुध्दा यात उभे केले जातात. सर्व प्रेक्षकांना या कलाकृती आनंदाबरोबर माहिती व बोधही देतात. कोणाला त्यातून स्फूर्ती मिळते तर कोणाला कल्पना सुचतात. प्रसिध्द चिनी तत्ववेत्ता कॉन्फ्यूशियस याच्या शब्दात सांगायचे झाल्यास कारीगरांना त्यातून भाकरी प्राप्त होते व ते त्यावर जीवंत राहतात आणि दर्शकांना असे फूल गवसते की ज्याला पाहून त्याला जीवनाचे प्रयोजन समजते. सगळे लोक कदाचित इतका सूक्ष्म विचार करत नसतीलही पण त्यांच्या नकळत ते घडतच असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्याने केलेली आरास ही समाजाला अनेक दृष्टीने उपकारक आहे यात शंका नाही. इतर प्रसारमाध्यमातून कधी कधी दिसून येणारा गलिच्छपणा किंवा ओंगळपणा याची बाधा गणरायाच्या दरबाराला अजून तरी झालेली नाही.
नवनवीन दृष्ये दाखवणारे गणेशोत्सवाचे मंडप पाहतांना महिनोमहिन्यांच्या परिश्रमातून साकारलेले हे देखावे आठदहा दिवसानंतर नष्ट करण्यात येणार आहेत हा विचार अस्वस्थ करतो. यातील निवडक देखावे एकाद्या विशाल सभागृहात ठेऊन त्याचे लंडनच्या मादाम तुसाद म्यूजियमसारखे संग्रहालय करता येईल असेही वाटते. पण त्यातील सर्वात महत्वाच्या स्थानी असलेल्या गणेशाचे तर विसर्जन करायचे असते. शिवाय आपल्याकडे एवढ्या तेवढ्या कारणांवरून कोणा ना कोणाच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यातून निषेध, दंगेधोपे आणि हिंसाचाराचे सत्र सुरू होते या बातम्या वाचल्यानंतर मनातला तो विचार मागे पडतो.
एकदा उत्सव संपला की या सगळ्यांचे स्वरूप अमूक इतके टन किंवा घनफूट प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा थर्मोकोल एवढेच उरते आणि ते पर्यावरणाच्या स्वाधीन केले जाते. यालाच पर्यावरणाप्रेमी लोकांचा आक्षेप आहे. त्यापासून कोणकोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते ते या लेखाच्या पहिल्या भागात मी सांगितले आहे आणि त्यावर सुचवलेले उपाय कोणते आहेत हे मागील भागात दिले आहे. ते कां अंमलात येत नाहीत ते या भागात पाहू.
कोणताही नवा पदार्थ उपयोगात येण्यापूर्वी त्याचे गुणधर्म, उपलब्धता, उपयुक्तता आणि मूल्य यांचा विचार केलेला असतो. यात जो सकस ठरतो तो टिकतो आणि जुन्या तत्सम पदार्थाची जागा घेतो हा जगाचा सर्वसाधारण नियम आहे. ऑटोरिक्शा आल्यामुळे अनेक टांगेवाल्यांचा धंदा बसला आणि साखरेच्या आगमनानंतर अनेक गु-हाळे बंद पडली ही त्याची उदाहरणे आहेत. या गोष्टींना इलाज नाही कारण आपण कालचक्र उलट फिरवू शकत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा थर्मोकोल यांच्या ऐवजी कागदाचा लगदा आणि पुठ्ठा वापरणे लहान प्रमाणात शक्य होईल पण आज जे भव्य देखावे तयार केले जात आहेत ते या माध्यमातून शक्य होणार नाही. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा थर्मोकोल न वापरणे याचा अर्थ या प्रकारच्या कलाकृती निर्माण न करणे असाच होईल. त्यापासून समाजाचे जे फायदे होतात ते मिळणार नाहीत त्यामुळे तो उपदेश मान्य होणार नाही. तेंव्हा हे करूच नये असा नकारत्मक विचार न करता त्यातून होणारे संभाव्य तोटे कसे कमी करता येतील यावर विचार व्हायला हवा.
असा विचार वेगळ्या कारणांमुळे आधीपासून होत आला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पुण्याच्या मुळामुठा या नद्यांच्या उथळ पात्रात मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन करणे शक्य नाही. त्या मूर्ती वाजत गाजत नदीच्या तीरापर्यंत नेऊन परत आणल्या जातात. मुंबईला समुद्रकिनारा असल्यामुळे अथांग सागर सगळे समाविष्ट करून घेईल असेच कोणालाही वाटेल. पण प्रत्यक्षात त्यात विसर्जित केलेल्या ब-याचशा मूर्तींना तो भग्न स्वरूपात किना-यावर आणून सोडतो. ते दृष्य हृदयविदारक असते आणि अनिरुध्द अकॅडमीसारख्या सेवाभावी संस्थांचे हजारो स्वयंसेवक विसर्जनाच्या दुस-या दिवशी किना-यांची सफाई करून त्यात वाहून आलेल्या मूर्तींचे पुनर्विसर्जन करतात. अशा गोष्टी समजावून सांगून समाजाच्या मनाची तयारी केली तर पुण्याचे उदाहरण मुंबईत गिरवता येण्यासारखे आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि थर्मोकोल हे पदार्थ कांही गणेशोत्सवासाठी मुद्दाम शोधले गेलेले नाहीत. अनेक प्रकारच्या उद्योगव्यवसायात त्यांचा उपयोग सर्रास मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यांचे पुढे काय होते? अशा प्रकारच्ये पदार्थ इतर कच-यापासून बाजूला काढून त्याची व्यवस्थित रीतीने विल्हेवाट लावणे हे नगरपालिकेचे काम आहे आणि ते करण्याचे प्रयत्न बृहन्मुंबईसह जगभरातल्या सगळ्या नगरपालिका करत आहेत. त्याच तंत्रांचा वापर थोड्या निराळ्या पध्दतीने करून गणेशोत्सवातून तयार होणारे हे निर्माल्य पर्यावरणाला कसे अपायकारक ठरणार नाही यासाठी काय करता येईल हे पाहिले पाहिजे आणि सुदैवाने तसा विचार होतही आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये आजकाल सारा भर एकाच प्रकारच्या प्रचारात दिला जात असल्यामुळे "गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण" आणि म्हणून "ते पर्यावरणाच्या विरोधी" अशी समीकरणे मांडली जात आहेत ती पूर्णपणे बरोबर नाहीत आणि समाजाला मान्य होणारी नाहीत.
या निमित्याने पर्यावरणाकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आणि रोजच्या जीवनात केले जाणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न तिने आपण होऊन केला तरी त्यातून बरेच कांही साध्य होईल.
. . . . . . .. (समाप्त)

2 comments:

HAREKRISHNAJI said...

Balanced article. Very very infomative I must say.

Anand Ghare said...

आभारी आहे.