Wednesday, May 09, 2018

स्मृती ठेउनी जाती - भाग १५ - सतीश भावे

आमच्या कॉलनीमधल्या बिल्डिंग्जच्या स्टिल्टमध्ये आणि रस्त्याच्या कडेला बाकडी मांडून ठेवलेली आहेत. मोकळ्या हवेत श्वास घेत घटका दोन घटका गप्पा मारत बसणारे माझ्यासारखे काही रिकामटेकडे लोक सकाळ संध्याकाळी त्यांच्यावर बसलेले दिसतात. आमच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे सतीश भावे रोज सकाळी लवकर उठून सव्वासहाच्या सुमाराला खाली उतरत असत, हातातली काठी टेकत एक एक पाऊल टाकत ते हळूहळू कॉलनीच्या गेटपर्यंत जाऊन येत आणि एका बाकड्यावर बसून विश्रांती घेत असत. चौथ्या मजल्यावरचे वैद्य कांही मिनिटांनंतर खाली उतरून त्यांना झेपेल तेवढे चालून फिरून येत आणि भाव्यांच्या शेजारी येऊन गप्पा मारत बसत. त्यांचा समवयस्क असा मी सुद्धा सकाळी साडेसहाच्या सुमाराला खाली उतरून येत असे तेंव्हा मला रस्त्यावर फिरत असलेले भावे बहुधा रोज भेटायचे आणि कधी कधी वैद्यसुद्धा. मी साडेसात वाजता परत येत असे तेंव्हा अनेक वेळा ते दोघेही बाकड्यावर बसलेले असायचे.

एकदा त्यांनी मला पाहून खूण करून बोलावून घेतले आणि आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. त्यानंतर मीसुद्धा दहा वीस मिनिटे त्यांच्यासोबत थांबायला लागलो. भावे अत्यंत वक्तशीर होते. त्यांची घरी परत जाण्याची ठरलेली वेळ झाल्यावर ते उठून चालले जात असत पण वैद्यांना घाई नसे. ते मला थांबवून घेत आणखी कोणी येणारा जाणारा दिसला तर त्यालाही हाक मारत. वैद्य आणि भावे हे दोघेही अस्सल पुणेकर आणि चौकसपणा हा पुणेरी गुण त्यांच्या अंगी पुरेपूर भरलेला.  त्यांना इथली खडा न् खडा माहिती असायची. पुण्यातले अमूक भाऊसाहेब किंवा तमूक काकासाहेब यांच्यापासून ते त्यांचे सगळे बहीणभाऊ, काकामामा वगैरे कोण कोण कुठल्या पेठेमधल्या कोणत्या वाड्यात रहात होते आणि तिथून कुठल्या नगरातल्या कोणत्या सोसायटीत रहायला गेले वगैरे आणि ते काय काय उद्योग करत होते या सगळ्या माहितीचे ज्ञानकोष त्यांच्याकडे असल्याने ते आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून सहजपणे पुण्याच्या भूतकाळात जाऊन त्यात रमत असत. मी इथे नवखा असल्यामुळे त्यातल्या काही प्रसिद्ध माणसांची आणि कांही जागांची नांवे कधी तरी माझ्या कानावर पडली असतील एवढेच माझे ज्ञान होते. या जोडीच्या गप्पा ऐकून माझ्या पुण्याबद्दलच्या सामान्यज्ञानात खूप भर पडली.  भाव्यांचे इतर बाबतीतले सामान्य ज्ञानसुद्धा चांगले समृद्ध होते. त्यांचे  बोलणे खुमासदार असायचे, त्याला विनोदाची झालर असायची यामुळे मला ते ऐकतांना मजा वाटत असे.

ते स्वतःबद्दल मात्र फारसे बोलत नसत. त्यांच्या बोलण्यात आत्मप्रौढीचा तर लवलेशही  नसायचा. त्यांना चालतांना होत असणारे कष्ट पाहून मी एकदाच त्यांना कसला त्रास आहे असे चुकून विचारले. त्यावर त्यांनी हंसून उत्तर दिले की त्यापेक्षा कुठला त्रास नाही असे विचारा. आमच्या वयाचे इतर कांही लोक त्यांना असलेल्या किंवा नसलेल्या व्याधी आणि त्यावरील उपाय यांची चर्चा करून ऐकणाऱ्याला बेजार करतात, पण भाव्यांनी मात्र त्या विषयावर माझ्यापुढे कधीच चकार शब्दही काढला नाही. त्यांची बरीच मोठी मेडिकल हिस्टरी असावी एवढे मला जाणवत होते पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत आणि प्रसन्न अशीच मुद्रा असायची. ते नेहमी आपल्यासोबत एक सेलफोन घेऊन येत आणि त्यावर सुरेल गाणी लावून स्वतः ऐकत आणि आम्हाला ऐकवत असत.

आमची इमारत ते कॉलनीचे गेट या रस्त्याशिवाय इतर कुठे मी भावे यांना पाहिले नाही. त्यामुळे मी त्यांना जास्त लोकांबरोबर बोलतांना पाहिले नाही. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीला त्यांची उपस्थिति नसायची. कदाचित त्यांना तेवढे चालणे झेपत नसावे, पण त्यांना अशा जनसंपर्काची आवड मात्र होती. ते आमच्या संघाचे सभासद तर झाले होतेच, त्यातल्या कांही लोकांनी सुरू केलेल्या वॉट्सअॅप ग्रुपचेही सदस्य झाले होते आणि वेळोवेळी निवडक मजेदार पोस्ट टाकत असत.

तीन चार दिवसांपूर्वी एकदा मी संध्याकाळी कुठेतरी चाललो होतो. लिफ्टमधून खाली उतरलो तर ही जोडगोळी समोरच्या बांकड्यावर बसली होती. भाव्यांनी मला हात उंचावून दाखवला आणि मी त्यांना हातानेच टाटा करीत माझ्या वाटेने पुढे गेलो. मला त्यांच्याशेजारी पांच मिनिटे बसून बोलायला पाहिजे होते, माझ्या अंतमनाला तसे वाटलेसुद्धा होते, पण तेंव्हा ते घडले नाही. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेलो नाही कारण मला एका अत्यंत महत्वाच्या समारंभाला जायचे होते. ते मंगल कार्य चाललेले असतांनाच मला वॉट्सअॅपवरून एक धक्कादायक बातमी समजली, पण ती कुणाला न सांगता मी वॉट्सअॅपच बंद करून टाकला. संध्याकाळी परत आल्याआल्याच आमच्या बिल्डिंगच्या रखवालदाराने तिला दुजोरा देत भाव्यांना वैकुंठधामात नेले असल्याचे सांगितले. दिवसभर झालेल्या दगदगीनंतर तिकडे जाण्याइतके त्राण माझ्या अंगात उरले नव्हते.

दुसरे दिवशी सकाळी साडेसहा वाजता मी रोजच्या प्रमाणेच योग वर्गाला जाण्यासाठी म्हणून घरामधून निघालो आणि लिफ्टमधून खाली उतरलो. तळमजल्यावरील लिफ्टच्या बाजूला असलेल्या कोलॅप्सिबल गेटच्या बाहेर एक पेपरवाला वर्तमानपत्रांचा गठ्टा घेऊन उभा होता आणि आतल्या बाजूला आमचे वैद्य आजोबा उभे होते. गेटला लावलेले कुलुप कोणीतरी येऊन उघडेल याची ते वाट पहात होते. त्यांच्याशी नजरानजर होताच आम्हा दोघांचेही डोळे पाणावले. रोज पहाटे आम्हा दोघांच्याही आधी उठून फिरायला जाण्यासाठी बाहेर पडणारे आमचे मित्र भावे आज खाली उतरले नव्हते आणि  . . .  ते यापुढे कधीच उतरणार नव्हते. कोणाच्याही ध्यानी मनी नसतांना ते आमचा कायमचा निरोप घेऊन, किंबहुना कुणाचाही निरोप न घेताच, काल अचानक देवाघरी चालले गेले होते. 

भावे यांचा बहुश्रुतपणा आणि त्यांचे संगीताचे प्रेम मला ठाऊक होते, पण त्याबद्दल जास्त माहिती त्यांच्या एका जुन्या सहकाऱ्याने फेसबुकवर वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून मला मिळाली. त्यातला काही भाग मी खाली दिला आहे. आमचे जे काही बोलणे झाले ते रस्त्यावर उभ्याउभ्या किंवा बाकड्यावर बसून झाले. ते शरीराने अपंग झाले होते, कुठे जात येत नव्हते, पण मग मीच पुढाकार घेऊन त्यांच्या घरी गेलो असतो, त्यांच्याबरोबर अधिक जवळीक केली असती तर त्यांच्या अमूल्य खजिन्यातली काही रत्ने पहायची संधी मिळाली असती.  आता असा विचार करून काही उपयोग नाही. सतीश भावे तर त्यांच्या आठवणी मागे ठेऊन  पुढच्या प्रवासाला चालले गेले आहेत.
---------------------------------------------------------------------------------

पराधीन आहे जगती.....

 एखाद्या व्यक्तीशी आपण जिवाभावाचे बोलतो आणि पुढच्या पंधरा मिनिटांनी ती व्यक्ती या जगाचा कायमचा निरोप घेते हे सत्य स्वीकारण्याच्या पलीकडचे होते, अनाकलनीय होते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या एका वाक्यात ग दि मां नी वर्णन केलंय पण ते पचनी पडणे अवघड ! ज्यांच्याशी आपले भावबंध निर्माण झालेले असतात त्यांचे जाणे मनाला चटका देऊन जाते.

मी सात वर्षे सकाळ मध्ये नोकरी केली तेंव्हा भावेसाहेब माझे वरिष्ठ अधिकारी होते. सात वर्षे त्यांचा जवळून सहवास लाभला. आमचे भावेसाहेब म्हणजे पु लं चे रावसाहेबच ! वाक्याची सुरुवात शिवीशिवाय करणार नाहीत, पण या सर्व शिव्या प्रेमाच्या. कधी बोचल्या नाहीत, टोचल्या नाहीत. उलट त्या शिव्यांमुळेच आम्ही ' सकाळ' चे सर्व माजी कर्मचारी त्यांच्यावर प्रेम करायचो. हेवी डायबिटीसमुळे त्यांच्या शरीराला कधी साखर चालायची नाही पण जिभेवरच्या साखरेने मात्र त्यांनी सर्वाना आपलेसे केले होते. कधी कोणत्या कर्माचा-यावर रागावले नाहीत कारण प्रेमाच्या शिव्यांनी सर्व कामे आपसूक होऊन जायची. मधुमेहाने ते खरे तर आयुष्यभर बेजार झाले होते. रोज एक इंजेक्शन घेतल्याशिवाय त्यांना नास्ता, जेवण करताच यायचे नाही. त्यामुळे रोज तीन तीन वेळा स्वतः इन्श्युलीन टोचून घ्यायचे. पण आयुष्याच्या आनंदाला त्यांनी कधीही दूर लोटले नाही. विविध प्रकारची पेन्स गोळा करण्याचा त्यांना छंद होता. कोणतेही वेगळे पेन दिसले की ते विकत घेत. आजपर्यंत तीनेक हजार पेन्स त्यांनी नक्कीच जमवली असतील. शिवाय. ते स्वतः गायक नसले तरी शास्त्रीय संगीताचा त्यांचा अभ्यास होता. दरवर्षीचा सवाई गंधर्व महोत्सव कधी चुकवला नाही. प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, किशोरी आमोणकर, रशीद खान आणि पंडित भीमसेन जोशी हे त्यांचे आवडते कलाकार ! त्यांच्या असंख्य कॅसेट आणि सीडीज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर हा माणूस सतत संगीतात हरवलेला असायचा. मधुमेहामुळे असंख्य व्याधींनी शरीरावर ताबा मिळवला होता पण मनावर मात्र संगीताने अधिराज्य गाजवत व्याधींची तीव्रता कमी केली होती. इतकी दुखणी असूनसुद्धा हा माणूस कधी निराश झालेला दिसला नाही. त्या दुखण्याला दोन शिव्या हसडून मनातली वेदनेची भावना बाहेर फेकून देत असत. त्यामुळे त्यांचे जीवन तर सुसह्य झालेच शिवाय मृत्यूनेसुद्धा दबक्या पाऊलानेच झडप घातली. असा अचानक मृत्यू फार कमी भाग्यवंतांना येतो.

अरुण दाते या " तानसेनाच्या " जाण्याने काल संगीत क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले. आणि भावे साहेब यांच्यासारख्या " कानसेनाच्या " जाण्याने झालेले नुकसान सुद्धा माझ्यादृष्टीने मोठे आहे !

हरी ओम !

अभय देवरे


No comments: