Wednesday, February 28, 2018

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ


महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ या विषयावरील एक चित्रमय लेख सुमारे दहा वर्षांपूर्वी ई मेल्सवर फिरत होता. त्या माहितीपूर्ण लेखातला काही भाग अतिरंजित आणि काही भाग कपोलकल्पित असल्यामुळे त्या वेळी मला तो फारसा विश्वसनीय वाटला नव्हता. पण त्या लेखामुळे माझ्या मनातली जिज्ञासा जागृत झाली आणि मी आंतर्जालावर थोडे उत्खनन करून सहजपणे मिळेल तेवढी माहिती गोळा केली. त्या माहितीच्या आधारावर थोर भारतीय शास्त्रज्ञ या नावाची एक लेखमाला मी पांच भागात लिहून प्रकाशित केली होती.


महान भारतीय शास्त्रज्ञ - भाग १, २, ३, ४ आणि ५

http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_02.html
http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_9750.html
http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_03.html
http://anandghan.blogspot.in/2008/05/blog-post_05.html

मला त्यानंतरच्या काळात या विषयावरील अनेक लेख आणि साधक बाधक चर्चा वाचायला मिळाली. या वर्षी पुण्यात भरलेल्या आंतरराष्ट्रीय वेद विज्ञान परिषदेच्या प्रदर्शनाला भेट देऊन तिथून आणखी काही माहिती आणि चित्रे मिळवली. याच सुमारास मला शिक्षण विवेक या मासिकासाठी एक लेख लिहिण्याबद्दल विचारणा करण्यात आली. या दृष्टीने माझी तयारी सुरू असल्यामुळे मी त्यांना लगेच होकार दिला आणि हा लेख लिहून दिला. मी तयार केलेली सर्व चित्रे त्या मासिकामध्ये जागेअभावी दिली गेली नव्हती. मी या अनुदिनीमध्ये त्यांचा समावेशसुध्दा केला आहे. त्यामधून माझ्या लेखाचा विषय अधिक स्पष्ट होऊ शकेल.

ओळख प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची

 प्राचीन भारतामध्ये एक अत्यंत विकसित आणि समृध्द अशी संस्कृती नांदत होती. तिच्या प्रगतीला असंख्य विद्वानांनी हातभार लावला होता, त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची नोंद आता उपलब्ध नाही. काही शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ किंवा संहिता त्यांच्या नावानिशी माहीत आहेत. प्राचीन भारतीयांनी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन त्यानंतर या थोर शास्त्रज्ञांची ओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न या लेखात मी केला आहे. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून दाखवले होते. कोणाही भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे ते शास्त्रज्ञ होते.

आपले पूर्वज सोने, चांदी, लोखंड, तांबे आणि त्यांचे मिश्रधातू यांचा उपयोग करत होते. हे धातू तयार करण्यामध्ये खाणकाम (Mining), रसायनशास्त्र (Chemistry) आणि धातुविज्ञान (Metallurgy) या विद्यांचा भरपूर विकास प्राचीन भारतामध्ये झाला होता. अनेक प्रकारच्या रासायनिक क्षारांची निर्मिती करायच्या प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी उपकरणे त्यांनी विकसित केली होती. प्राणी आणि वनस्पतींचा सखोल अभ्यास करून त्यांचा उपयोग करण्याची शास्त्रे त्यांनी लिहिली होती. खगोलशास्त्रामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते आणि त्यासाठी गणिताचे ज्ञान आवश्यक होतेच. शरीर आणि मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली आयुर्वेद आणि योग ही शास्त्रे आजही अत्यंत उपयुक्त आहेत. वास्तुशास्त्रामध्ये घरे, मंदिरे इत्यादि बांधण्यासाठी स्थापत्यशास्त्राचे नियम तयार केले. त्यांच्या आधारे बांधलेली भव्य प्राचीन मंदिरे त्याची साक्ष देतात. संस्कृत ही जगातली सर्वात जुनी अशी व्याकरणबध्द आणि अद्भुत भाषा आहे. तिच्यात विशाल शब्दभांडार आहेच, शिवाय कालमानानुसार नवनवे अर्थपूर्ण शब्द निर्माण करायची क्षमता आहे.


आचार्य चरक  यांना वैद्यकीय शास्त्राचे जनक आणि आचार्य शुश्रुत यांना शल्यचिकित्सेचे जनक  मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता हे आयुर्वेदाचे पायाभूत ग्रंथ आहेत. आजचे वैद्यराजही त्यांच्या आधारे चिकित्सा आणि उपचार करतात. चरकमहर्षींनी व्याधींचा प्रतिबंध, निदान आणि निवारण या तीन्हीबद्दल लिहिले आहे.  रोगावर उपाय करण्यापेक्षा तो न होऊ देणेच अधिक चांगले "Prevention is better than cure" हे तत्व त्यांनी सांगितले होते. शरीरामधील कफवातपित्त हे त्रिदोष, रक्त, मांस, मज्जा, अस्थि वगैरे सप्तधातु, अन्न आणि औषधे यांचा त्यांचेवर होणारा परिणाम ही आयुर्वेदाची मूळ तत्वे त्यांनी सांगितली. शरीरपरीक्षा, मानसपरीक्षा आणि सारासारतत्व अशा रोगाचे निदान करण्याच्या पध्दती, त्यावर करण्याचे उपचार, वनस्पतीजन्य आणि रासायनिक औषधे वगैरे सर्वांबद्दल त्यांनी लिहिले.  सुश्रुतमहर्षीं हे अत्यंत कुशल असे शल्यविशारद (सर्जन) होते. निरनिराळ्या शस्त्रक्रियांसाठी उपयुक्त अशा खास प्रकारच्या सुया, चिमटे आणि चाकू आदि हत्यारे त्यांनी तयार करून घेतली होती. हाडे, त्वचा (प्लॅस्टिक सर्जरी) आणि डोळे (मोतीबिंदू) वगैरेंच्या शस्त्रक्रियांसंबंधी सविस्तर माहिती त्यांच्या संहितांमध्ये दिली आहे. आज अधिक चांगल्या आधुनिक सोयी उपलब्ध आहेत, त्यामुळे सश्रुतसंहितेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत, पण आयुर्वेदिक पध्दतीने उपचार केले जातात. सुश्रुतसंहितेमध्ये शल्यचिकित्सेशिवाय आयुर्वेदासंबंधी पुष्कळ माहिती आहे. शेकडो प्रकारचे रोग, औषधी वनस्पती आणि अनेक प्रकारची प्राणीजन्य व रासायनिक औषधे यांची माहिती त्यात आहे. महर्षी पतंजलि यांनी शरीर आणि मन निकोप आणि सुदृढ करण्यासाठी अष्टांग योग सांगितले होते. त्यामधील योगासने आणि प्राणायाम आज जगभरात लोकप्रिय झाले आहेत आणि कोट्यावधि लोक त्याचा लाभ घेत आहेत.

 आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि महान शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्र व गणितशास्त्रामध्ये फार मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्या ग्रंथांवर इतर विद्वानांनी भाष्य किंवा टीका लिहिल्या होत्या, तसेच त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशात गेले होते. आर्यभटांनी अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती या सर्वांमध्ये आपली छाप उमटवली. त्यांनी शून्याची कल्पना मांडली, बीजगणितामधील समीकरणे सोडवली, पाय (π) या आकड्याचे ३.१४१६ इतके अचूक मूल्य काढले,  त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र सांगितले आणि ज्या, कोज्या (साइन, कोसाइन) यांची  संकल्पना मांडून त्यांची कोष्टके तयार केली. आर्यभटांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शंकुयंत्र, छायायंत्र, धनुर्यंत्र, चक्रयंत्र, छत्रयंत्र यासारखी विविध उपकरणे तयार केली आणि त्यांचा उपयोग करून आकाशातील ग्रहता-यांची अत्यंत सूक्ष्म अशी निरीक्षणे केली. पृथ्वी गोलाकार असून तिचा परीघ किती आहे आणि ती स्वतःभोवती फिरते असे सांगितले, सूर्य आणि चंद्रग्रहणे कशामुळे होतात त्याचा शोध लावला आणि ती कधी व केंव्हा होतात याचे अचूक गणित मांडले. पंचांग तयार करण्यासाठी आर्यभट, भास्कराचार्य आदींनी दिलेल्या खगोलशास्त्रीय गणिताचा उपयोग शतकानुशतके होत राहिला.


वराहमिहिर यांनी विपुल ग्रंथरचना करून आर्यभटादि शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन पुढे नेले. गणिताच्या ज्ञानात स्वतःची भर घातलीच, प्रकाशाचे परावर्तन कसे होते यावर विचार मांडले. जमीनीवरील सर्व वस्तूंना जमीनीशी जखडून ठेवणारी एक अद्भुत शक्ती आहे असे प्रतिपादन करून एका अर्थी गुरुत्वाकर्षणाचे सूतोवाच केले.  ब्रह्मगुप्त यांनीही गणितावर खूप महत्वाचे संशोधन केले. त्यांनी इतर आंकड्यांची शून्याबरोबर बेरीज, वजाबाकी व गुणाकार करण्याचे नियम सांगितले. ऋणसंख्या ही नवी संकल्पना मांडली. त्यानंतर अंकगणिताचे स्वरूपच बदलून गेले. ब्रह्मगुप्त यांनी भूमितीमधील आकारांची क्षेत्रफळे आणि बीजगणितामधील समीकरणांची उत्तरे काढण्याची सूत्रे मांडली. या तीन शास्त्रज्ञांच्या काळानंतर सुमारे चारपाचशे वर्षांनी द्वितीय भास्कराचार्य हे अद्वितीय शास्त्रज्ञ होऊन गेले. सामान्य बुद्धीच्या गणकांना बोधकर होईल आणि चतुर व ज्ञानी गणकांच्या मनात प्रीती उत्पन्न करेल असा ‘सिद्धान्तशिरोमणी’ हा ग्रंथ या भास्कराचार्यानी लिहिला. त्यात लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि गोलाध्याय असे चार भाग आहेत. त्याशिवाय त्यांनी आणखी काही विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असतात. चंद्रावर पंधरा पंधरा दिवसांचे दिवसरात्री असतात, हे भास्कराचार्याना माहीत होते. ग्रहांचे भ्रमणकाळ आणि त्यांच्या दैनंदिन गती यांच्या अचूक किंमती त्यांनी काढल्या. ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांची तात्कालिक गती काढण्यासाठी कॅलक्युलससारखे सूत्र वापरावे लागते ते त्यांनी तेव्हा वापरले होते. भास्कराचार्य केवळ सैद्धांतिक खगोलशास्त्रज्ञ नव्हते तर ते उत्तम आकाश निरीक्षक होते.


या शास्त्रज्ञांखेरीज कणाद मुनि आणि नागार्जुन यांची नांवेही आदराने घेतली जातात. जगामधील सर्व पदार्थ सूक्ष्म अशा कणांमधून बनले आहेत असे प्रतिपादन कणाद मुनींनी केले होते. नागार्जुनांनी रसायनशास्त्राचे खूप प्रयोग केले. त्यांना अपेक्षित होते त्याप्रमाणे हिणकस धातूंचे सोन्यामध्ये रूपांतर करता आले नाही, पण त्या प्रयत्नात त्यांनी तसे चमकणारे अनेक नवे मिश्रधातु तयार केले आणि अनेक प्रकारची रासायने व रासायनिक क्रियांसाठी लागणारी विशेष उपकरणे तयार करून घेतली. या रसायनांचा उपयोग धातुशास्त्र आणि औषधांसाठीसुध्दा केला जात असे. बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे कांही ग्रंथ उजेडात आले, बरेचसे नष्ट झाले. आज जेवढी माहिती सहज उपलब्ध आहे त्यावरून त्यांच्या कार्याचा फक्त अंदाज घेता येतो.

या भारतीय शास्त्रज्ञांनी आपली सगळी ग्रंथरचना संस्कृत भाषेत काव्यबध्द केली आहे. त्या प्रयत्नात शास्त्रीय माहितीचा नेमकेपणा रहात नाही आणि ती समजणे कठीण होते. शिवाय संस्कृत भाषेमधील पंडितांना विज्ञान माहीत नसते आणि विज्ञान शिकलेल्यांना संस्कृत भाषा समजत नाही, कालमानानुसार आणि संदर्भाप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलतात अशा अनेक अडचणी आहेत. प्राचीन काळात कुठल्याही विधानाचा शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत नसावी. त्यामुळे सिध्दांत मिळतात, पण त्यांची सिध्दता नाही, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'फॉर्म्युले' मिळतात पण त्यांचे 'डेरिव्हेशन' मिळत नाही. यामुळे ते संशोधन आज प्रचलित असलेल्या वैज्ञानिक पध्दतीनुसार स्पष्ट होत नाही. तरीही सारांशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे. ती डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

                                                                                                                                                                 

  

Friday, February 16, 2018

विज्ञान म्हणजे काय ?

'विज्ञान' हा हजारो वर्षे जुना संस्कृत शब्द आहे. 'विशिष्ट ज्ञान' असा त्याचा व्यापक अर्थ आहे. पण अलीकडच्या काळात 'विज्ञान' या शब्दाचा उपयोग इंग्रजीमधील 'सायन्स' या शब्दाच्या अर्थाने प्रचलित झाला आहे. कुठल्याही विषयाच्या पध्दतशीर ज्ञानाला 'शास्त्र' असे म्हणतात, पण धर्म, न्याय, नीती वगैरेंमध्ये पारंगत असलेल्या माणसांना शास्त्री म्हणून ओळखले जाते आणि 'सायंटिस्ट' या शब्दाला प्रतिशब्द म्हणून 'शास्त्रज्ञ' हा शब्द योजला जातो 'विज्ञान', 'शास्त्रज्ञ' आणि 'तंत्रज्ञान' हे शब्द मी अनुक्रमे 'सायन्स', 'सायंटिस्ट' आणि 'टेक्नॉलॉजी' या अर्थाने या लेखामध्ये लिहिले आहेत.

विश्वामधील निर्जीव पदार्थ आणि सजीव प्राणिमात्र यांचा पध्दतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान (किंवा सायन्स) हा या शब्दाचा सोपा अर्थ आहे. तसा अभ्यास करूनच मानवाने त्यांचेमधील गुणधर्म आणि त्यात होत असलेल्या बदलांचे नियम समजून घेतले आणि त्यांचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. हा अभ्यास आदिमानवाच्या काळापासून चालत आला आहे. प्राचीन भारतामध्ये एक अत्यंत विकसित आणि समृध्द अशी संस्कृती नांदत होती. असंख्य विद्वानांनी आणि शास्त्रज्ञांनी तिच्या प्रगतीला हातभार लावला होता. पण त्यांनी आपल्या नावांच्या नोंदी करून ठेवलेल्या नव्हत्या. कसलेही श्रेय स्वतःकडे घेण्याची कोणाची प्रवृत्तीच नव्हती. यामुळे त्या सर्व अनामिक शास्त्रज्ञांची ओळख आता उपलब्ध नाही.  इजिप्त, इराक, चीन, दक्षिण अमेरिका आदि भागांमध्येसुध्दा प्रगत संस्कृतींचे अवशेष मिळतात. त्यावरून तिकडल्या भागात झालेल्या विज्ञानामधील प्रगतीचा सुध्दा अंदाज घेता येतो.

कणाद ऋषींनी त्यांच्या वैशेषिक सूत्रामधून 'वैशेषिक' नावाचे तत्वज्ञान दिले होते. आगीच्या ज्वालांनी नेहमी वरच्या बाजूला जाणे आणि पावसाच्या पाण्याचे वरून खाली पडणे, पाण्याचे जमीनीवरून वहात जाणे अशा उदाहरणांवरून ते कशामुळे होत असेल असा विचार त्यात केला होता. निसर्गातील घटनांमध्ये कांही कार्यकारणभाव असतो असा विचार त्यात मांडला होता. विश्वामधील सर्व द्रव्ये अविभाज्य अशा सूक्ष्म कणांच्या संयोगामधून तयार झाली आहेत असे प्रतिपादन त्यांनी या चिंतनामधून केले होते, पण पुढे त्यांचा संबंध तत्वज्ञानाशी जोडला होता.  "मी जे शिकलो आणि प्रयोग करून सिध्द केले तेच मी या ग्रंथात लिहिले आहे. माझ्या शिष्यांनीसुध्दा स्वतःच्या अनुभवावरूनच त्यावर विश्वास ठेवावा." असे कांहीसे यशोधर नावाच्या विद्वानाने लिहिलेल्या ग्रंथात सांगितले होते. ही फक्त दोन उदाहरणे झाली. यातले विचार आधुनिक विज्ञानाच्या  जवळचे आहेत. "ईश्वराची करणी आणि नारळात पाणी" अशा प्रकारच्या श्रध्देच्या पलीकडे जाऊन या शास्त्रज्ञांनी निसर्गनियमांचा बारकाईने अभ्यास केला होता.

आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य आदि विद्वानांनी कांही प्रत्यक्ष निरीक्षणे केली, त्यावर तर्कसंगत विचार केला आणि गणित व खगोलशास्त्रामधले अनेक सिध्दांत मांडले. त्यांच्या ग्रंथांमध्येसुध्दा विज्ञानाबरोबर तत्वज्ञानाचा समावेश आहे. त्यामधले कोणते ज्ञान ते गुरूकडून शिकले, कोणते त्या काळातल्या इतर विद्वानांनी सांगितले होते आणि त्यांनी स्वतः त्यात कशाच्या आधारावर कोणती भर घातली या सर्वांचे खुलासेवार तपशील आज मिळत नाहीत, त्यामुळे ब्रह्मगुप्ताने किंवा वराहमिहिराने स्वतःच अमूक अमूक शोध लावले असे आज कदाचित ठामपणे सांगता येणार नाही. पण रूढ विचारांपेक्षा वेगळा विचार करणे आणि तो आपल्या रचनांमध्ये मांडणे याचे भारतामधील विद्वानांना स्वातंत्र्य होते हे त्यातून सिध्द होते. हे वातावरण विज्ञानाच्या प्रगतीला पोषक होते, पण या प्राचीन विद्वानांच्या वैज्ञानिक विचारांचा प्रसार मधल्या काळात कुठे तरी थांबला, त्यांनी दिलेल्या विज्ञानात नवी भर पडली नाही आणि त्यांचे मौलिक विचारही इथल्या जनमानसात आणि पारंपरिक शिक्षणपध्दतीत रुजले नाहीत. त्यांचे विज्ञान तत्वज्ञानात गुरफटलेले राहिले आणि झाकले गेले.  कित्येक शतकानंतर अलीकडच्या काळात ते थोडे थोडे करून उजेडात येत आहे.

 युरोपमधील अॅरिस्टॉटल, टॉलेमी आदि जुन्या ग्रीक विचारवंतांनी मांडलेले विज्ञानविषयक विचारसुध्दा त्यांच्या तत्वज्ञानातले भाग होते. निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हा 'नॅचरल फिलॉसॉफी' या नावाने ओळखला जात होता. कोपरनिकस, गॅलीलिओ, पास्कल आदि मध्ययुगामधील शास्त्रज्ञांनी त्याच नावाने आजच्या सायन्स या विषयाचा अभ्यास केला होता. पण त्यांनी धीटपणे कांही नवे विचार मांडले. त्या काळातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्यांच्या क्रांतिकारक विचारांना विरोध केल्यामुळे कांही शास्त्रज्ञांना छळही सोसावा लागला. त्यानंतर हे चित्र हळूहळू बदलत गेले. प्रत्यक्ष प्रमाणावर म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त होणा-या ज्ञानावर जास्त विश्वास ठेवायला हवा, ती नवी माहिती रूढ समजुतींशी विसंगत असली तर त्या समजुती तपासून पहायला हव्यात, गतकाळातल्या विद्वानांनी जे सांगितले होते तेवढेच बरोबर असा अट्टाहास असू नये असे विचार पाश्चात्य समाजामधल्या विचारवंतांनी मांडायला सुरुवात केली. सर फ्रान्सिस बेकर या इंग्रज माणसाने कुठलाही महत्वाचा शोध लावला नसला तरी त्याने वैज्ञानिक पध्दतीचा पुरस्कार करून विज्ञानयुगाचा पाया घालण्यात जो मोलाचा वाटा उचलला त्यामुळे विज्ञानाच्या इतिहासात त्याचे नाव आदराने घेतले जाते.

 दोन तीन शतकांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये विज्ञानाला तत्वज्ञानापासून वेगळे करण्यात आले. निसर्गनियमांचा अभ्यास अशी सायन्स या नावानिशी त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली.  या जगात दोन प्रकारचे नियम असतात, मानवनिर्मित आणि निसर्ग निर्मित. मानवनिर्मित नियम किंवा कायदे कालानुसार बदलतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. निसर्गाचे नियम सर्वांना लागू होतात. हे निसर्गनियम आणि नैसर्गिक पदार्थांचे गुणधर्म चिरकाल टिकणारे असतात.

विज्ञानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ निसर्गाचे नियम आणि पदार्थांचे गुणधर्म फक्त समजून घेऊ शकतात, ते स्वतः नवे नियम तर करू शकत नाहीतच, त्यात कणभरसुध्दा बदल करू शकत नाहीत.  हे वैज्ञानिक निसर्गाचा अभ्यास करून त्यांना जे सत्य दिसेल, जाणवेल, जे आकलन होईल ते पध्दतशीरपणे मांडतात. विज्ञानामधील शोध, सिध्दांत, नियम वगैरे प्रयोगामधून सिध्द करता येण्यासारखे असतात. विज्ञानामध्ये तर्कशुद्ध विचाराला महत्व असते. कुठल्या तत्वाचा कोणी शोध लावला यापेक्षा तो कसा सिद्ध केला गेला हे महत्वाचे असते. सिध्दांतामागे असलेले विचार  किंवा प्रयोगामधून केलेली निरीक्षणे यांचा सखोल अभ्यास करून त्यावरून निष्कर्ष काढले जातात.  त्यांचे काम सिध्दांत, निरीक्षण, परीक्षण, विश्लेषण आणि त्यामधून निघणारे निष्कर्ष अशा क्रमवार पध्दतीने सुसंगतपणे मांडले जाते. इतर तज्ज्ञ त्यावर साधक बाधक विचार आणि चर्चा करतात, त्यांच्या मनातल्या शंका मांडतात, त्यांचे निरसन झाल्यानंतरच ते मान्य केले जाते. अशा प्रकारची वैज्ञानिक पध्दत आज जगभर रूढ झाली आहे.

 प्रयोग करतांना किंवा एरवीसुध्दा अनेक वेळा अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला माहीत नसली तरी ती असतात. ती शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगति होत जाते.

विज्ञानाच्या विकासाबरोबरच तंत्रज्ञानात सुधारणा होत गेल्या. प्रयोग करण्यासाठी नवनवी साधने आणि उपकरणे तयार होत गेली. उदाहरणार्थ दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रांमुळे मानवी दृष्टीने पहाण्याची क्षमता अनेकपटीने वाढली. अंतर, आकार, वजन, वेळ आदि गोष्टी मोजण्याची साधने खूप पूर्वीपासून उपयोगात आणली गेली होती आणि त्या गणनांचा उपयोग करण्यासाठी गणितशास्त्राचा विकास झाला होता. विज्ञानामध्ये नेमकेपणाला महत्व असल्यामुळे सर्व मोजमापे अचूक असावी लागतात. जसजसे नवे शोध लागत गेले त्याबरोबरच नवनवी उपकरणे तयार केली गेली आणि त्या उपकरणांचा दर्जा सुधारत गेला. उदाहरणार्थ विजेचा शोध लागल्यावर तिचा दाब (व्होल्टेज), प्रवाह (करंट), प्रतिरोध (रेझिस्टन्स) वगैरे मोजण्याची गरज पडली आणि त्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स तयार झाली. अधिक क्षमता असलेल्या चांगल्या उपकरणांच्या सहाय्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेगही झपाट्याने वाढत गेला.

काळाबरोबर विज्ञानाची एक परिभाषा तयार झाली आहे आणि त्यातील प्रत्येक संज्ञेची स्पष्ट व्याख्या केली जाते. उदाहरणार्थ फोर्स, प्रेशर, स्ट्रेस हे इंग्रजी शब्द वाङमयामध्ये कदाचित एकसारखे वाटत असले तरी विज्ञानाच्या परिभाषेत त्यांना विशिष्ट अर्थ आहेत, तिथे एका शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरता येत नाही. सूत्रे आणि समीकरणे मांडण्यासाठी या संज्ञांना काही चिन्हे दिली आहेत, त्यांच्या गणनेसाठी एकके (युनिट्स) ठरवली गेली आहेत आणि त्यांचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मानकीकरण (स्टँडर्डायझेशन) झाले आहे. अशा प्रकारे आजचे विज्ञान खूप पध्दतशीर आणि नियमबध्द झाले आहे.

प्रयोग करतांना किंवा एरवीसुध्दा अनेक वेळा विसंगत, अनपेक्षित किंवा धक्कादायक अनुभव येतात, त्यामागे असलेली शास्त्रीय कारणे आपल्याला त्या वेळी माहीत नसतात. ती चिकाटीने शोधून काढण्यामधूनच विज्ञानात प्रगति होत जाते. अंतर्ज्ञान, साक्षात्कार, दृष्टांत, चमत्कार यासारख्या संकल्पनांचा विज्ञानाच्या मुख्य प्रवाहामध्ये समावेश होत नाही. ज्ञानेंद्रियांच्या मदतीशिवाय मिळणा-या अगम्य आणि अतींद्रिय ज्ञानाचा अभ्यास 'एक्स्ट्रा सेन्सरी पर्सेप्शन' (ईएसपी) या नावाखाली केला जातो. विज्ञानाच्या निकषांमध्ये बसणारे आणि सर्वमान्य होतील असे नवे शोध त्या अभ्यासातून लागले तर त्यांचा समावेश विज्ञानात केला जाईल.

प्राचीन काळापासून ते आज प्रचलित असलेल्या विज्ञानाचे स्वरूप अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे.

--------------------------------------------------------------------------------------

Thursday, February 01, 2018

जर्मन शास्त्रज्ञ ओटो व्हॉन गेरिक


ओटो व्हॉन गेरिक हा जर्मन शास्त्रज्ञ सतराव्या शतकातला एक प्रमुख संशोधक आणि इंजिनियर होता. तो इटलीमधील गॅलीलिओ आणि टॉरिसेली तसेच फ्रान्समधील पास्कल यांचा समकालीन होता. त्या काळात चांगली संपर्कसाधने उपलब्ध नसतांनासुध्दा हे निरनिराळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या देशातले रहिवासी असलेले शास्त्रज्ञ एकमेकांशी थोडा संवाद साधत, एकमेकांची कामे पहात आणि त्यानुसार स्वतःचे संशोधन करत होते. काही बाबतीत त्यांचे संशोधन एकमेकांना न सांगता समांतरही चालत होते. त्या काळात युरोपातले सगळे पांडित्य लॅटिन भाषेत लिहिले जात असल्यामुळे त्याचा थोडा फायदा मिळत असावा. गेरिकने रिक्तता किंवा निर्वात पोकळी (Vacuum) आणि स्थितिक विद्युत (Static Electricity) या क्षेत्रात मोलाचे संशोधन करून नवी माहिती जमवली, सिध्दांत मांडले, तसेच टॉरिसेली आणि पास्कल यांच्या संशोधनाला प्रात्यक्षिको आणि प्रयोगांची जोड देऊन पुष्टी दिली. गेरिकने जमवलेल्या शास्त्रीय माहितीचा पुढील काळातल्या शास्त्रज्ञांना खूप फायदा झाला.

ओटो व्हॉन गेरिक याचा जन्म मॅग्डेबर्ग या शहरातल्या एका धनाढ्य जमीनदार कुटुंबात झाला. त्या काळात जर्मनी हा एक स्वतंत्र देश नव्हता. रोमन साम्राज्याच्या अंतर्गत निरनिराळ्या सुभेदारांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे त्या भागात अस्थिर राजकीय वातावरण होते. तशातच गेरिकने वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये गणित, भौतिकी (फिजिक्स) आणि इंजिनियरिंग या विषयांचा अभ्यास केला, तसेच काही काळ इंग्लंड आणि फ्रान्स या देशांमध्ये घालवला. त्यानंतर तो मॅग्डेबर्गला परत येऊन तिथे स्थायिक झाला आणि तिथल्या राजकारणात भाग घेऊन नगराध्यक्षपदापर्यंत पोचला.

त्याचा मूळ पिंड शास्त्रज्ञाचा असल्यामुळे त्याचा विज्ञानाचा अभ्यास चालतच राहिला. त्याला प्रात्यक्षिके आणि प्रयोग करण्यात विशेष रस होता आणि तो एक कुशल प्रशासक असल्यामुळे त्याला संशोधन करण्यासाठी साधनसामुग्री मिळवणे शक्य झाले. टॉरिसेलीने वर्तवलेल्या रिक्ततेच्या (व्हॅक्यूम) शक्यतेला इतर विद्वानांकडून मान्यता मिळवून देण्यात ओटो व्हॉन गेरिक याच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. गेरिकने पाणी उपसण्याच्या हातपंपामध्ये सुधारणा करून त्याला इतके सक्षम बनवले की बंद पात्रांमधली हवा बाहेर खेचून घेऊन त्यात कृत्रिमरीत्या निर्वात पोकळी तयार करणे शक्य झाले. निरनिराळ्या आकारांच्या भांड्यांवर प्रयोग करून पाहतांना त्यासाठी गोलाकार हा सर्वात चांगला असतो असे गेरिकच्या लक्षात आले. त्याने मॅग्डेबर्ग इथे केलेला प्रयोग प्रसिध्द आहे. या प्रयोगात त्याने दोन अर्धगोल पात्रांना जोडून त्यांच्या आतली हवा पंपाने उपसून बाहेर काढली. बाहेरील हवेच्या दाबामुळे ते अर्धगोल इतके घट्ट बसले की अनेक घोड्यांची शक्तीसुध्दा त्यांना एकमेकांपासून विलग करू शकली नाही. या एका प्रयोगामुळे हवेला दाब असतो हे सिध्द झालेच,  व्हॅक्यूम पंप हे एक संशोधकांसाठी उपयुक्त असे नवे यंत्र मिळाले.

ओटो व्हॉन गेरिकने या पंपाचा उपयोग करून रिक्ततेवर बरेच संशोधन केले. त्यामधून रिक्ततेचे भौतिक शास्त्र (फिजिक्स ऑफ व्हॅक्यूम) तयार झाले. निर्वात पोकळीमधून प्रकाशकिरण आरपार जाऊ शकतात पण ध्वनिलहरींच्या वहनासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता असते हे गुणधर्म गेरिकने सांगितले. निर्वात अवकाशाची (स्पेस) कल्पना गेरिकने पहिल्यांदा मांडली.  यामुळे पृथ्वीच्या सभोवती फक्त काही किलोमीटर्सपर्यंतच वातावरण असते आणि त्याच्या पलीकडील अनंत विश्वात निर्वात अशी पोकळी आहे, आपल्या डोळ्यांना ग्रहतारे दिसतात पण त्यांचा आवाज कां ऐकू येत नाही वगैरे गोष्टी पुढील शास्त्रज्ञांना सांगता आल्या.         

ओटो व्हॉन गेरिकने स्थितिक विद्युत (Static Electricity) या  विषयावरसुध्दा संशोधन केले. गंधकाच्या एका गोलकावर घासून त्याने सर्वात पहिल्यांदा कृत्रिम वीज निर्माण केली आणि विद्युतभारांमुळे होणारे आकर्षण आणि प्रतिकर्षण (रिपल्शन) प्रयोगामधून दाखवून दिले. त्यावेळी  कुणालाही स्थितिक विद्युत ही संकल्पनासुध्दा माहीत नसेल. यामध्ये महत्वाची गोष्ट ही होती की एकाद्या वस्तूला स्पर्श न करता तिला आपल्याकडे ओढता किंवा आपल्यापासून दूर ढकलता येणे हीच मुळी एक नवीन कल्पना होती. पृथ्वीकडेसुध्दा अगम्य अशी पण प्रचंड आकर्षण आणि प्रतिकर्षणशक्ती आहे अशी कल्पना ओटो व्हॉन गेरिकने मांडली. तोपर्यंत लोहचुंबकाबद्दल काही माहिती होती पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला नव्हता. त्या काळात हा सगळा तत्वज्ञानाचा भाग होता, सगळी काही ईश्वराची अपरंपार लीला आहे अशा विचारांचा काळ होता हे लक्षात ठेवले पाहिजे.

अशा प्रकारे ओटो व्हॉन गेरिक या शास्त्रज्ञाने अनेक नव्या कल्पना मांडल्या आणि त्यांना प्रात्यक्षिक आणि सैध्दांतिक पाठबळ देऊन त्यांचा पाठपुरावा केला. सतराव्या शतकाच्या काळात रूढ समजुतींना धक्का देणारे काही सांगणेसुध्दा मोठ्या धाडसाचे काम होते. गॅलीलिओसह कांही शास्त्रज्ञांना तर त्यासाठी छळ सोसावा लागला होता. हे पाहता ओटो व्हॉन गेरिक याच्या धडाडीचे कौतुक करावे लागेल. विज्ञानयुगाचा पाया घालण्यात त्याचाही मोठा वाटा आहे.