Saturday, August 05, 2017

सिंहगड रोड - भाग ५ (धायरी)

लहानपणापासूनच माझ्या मनात सिंहगड या शब्दाभोंवती एक उज्ज्वल ऐतिहासिक वलय होते. कदाचित त्यामुळे सिंहगड रोडबद्दलसुध्दा थोडे कुतूहल निर्माण झाले होते, पण त्या रस्त्यावरून प्रत्यक्षात एक दोन वेळा गेल्यानंतर ते मावळले. पन्नास वर्षांपूर्वी मी पुण्यात शिक्षण घेत असतांनाच्या काळात जसा सिंहगड रोड हा एक पुणे शहराच्या बाहेर जाणारा रस्ता होता त्याचप्रमाणे कर्वे रोड आणि पौड रोड हे सुध्दा त्या काळात गांवाबाहेरचेच रस्ते होते. पण नंतरच्या काळात त्या दोन रस्त्यांच्या आजूबाजूने नवनवीन वस्त्या निर्माण होत गेल्या आणि त्यांचा झपाट्याने विकास होत गेला. एकविसावे शतक उजाडेपर्यंत माझ्या ओळखीतली कांही जुनी मंडळी या भागात रहायला गेली होती आणि पुण्यात नव्याने आलेल्या लोकांनी तिथे घरे घेतली होती. माझे त्यांच्याकडे जाणे, येणे, राहणे व्हायला लागले होते. त्यामुळे पुण्याचे ते नवे भाग माझ्या माहितीतले होत होते. पण त्या मानाने पाहता सिंहगड रोड जरासा मागे राहिला होता. त्या भागात मोठमोठी हॉस्पिटल्स, कॉलेजे, उद्याने, थिएटरे, भव्य इमारती वगैरेसारख्या ठळक दिसणा-या खुणा तयार झाल्या नव्हता. मला कामासाठी तिकडे जाण्याची गरज पडत नव्हती. त्या भागातली दुकाने आणि बाजारपेठांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी झगमगाट व गजबजाट दिसत होता. २०११-१२ मध्ये मला दिसलेला धायरी भाग तर अजूनही मागास वर्गात मोडण्यासारखा वाटत होता. माझे तोंपर्यंतचे बहुतेक आयुष्य अणुशक्तीनगर आणि वाशीसारख्या सुनियोजित आणि टिपटॉप वसाहतींमध्ये आणि उच्चशिक्षित वर्गामधील लोकांमध्ये गेले असल्यामुळे आपण स्वतः या ग्रामीण वाटत असलेल्या धायरीमध्ये येऊन रहावे असा विचार त्या वेळी माझ्या मनात आला नाही.

पण नियतिची चक्रे आपल्याला अज्ञात अशा पध्दतीने फिरत असतात. तीनचार वर्षांच्या काळात माझा मुलगा धायरीला रहायला गेला आणि आम्ही त्याच्याबरोबर रहायला पुण्याला आलो, त्या भागातले रहिवासी झालो आणि "आम्ही ना, हल्ली सिंहगड रोडवर राहतो." असे सर्वांना सांगायला लागलो.

आपल्या वास्तव्याच्या नव्या भागाची माहिती तर करून घ्यायला हवीच ना ! मी थोडे हिंडून फिरून आणि विचारपूस करून ती करून घेली. धायरी हे पुरातन काळापासूनचे मूळ खेडेगाव सिंहगड रोडपासून काही अंतरावर वसलेले आहे. जुन्या मुख्य पुणे शहराबाहेर पडल्यावर दत्तवाडी, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी वगैरे पूर्वीच्या वस्त्या लागतात. त्यांना मागे टाकून वडगांव बुद्रुक पार केल्यानंतर सिंहगड रस्ता खडकवासल्यावरून सिंहगडाकडे जातो आणि त्याच्या डाव्या बाजूला येऊन मिळालेला रस्ता धायरी गांवाकडे जातो. खरे तर तिकडे जाणा-या त्या रस्त्याचे नाव धायरी फाटा असे होते. पण एकविसाव्या शतकात या जवळ जवळ दोन किलोमीटर लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरपूर वस्ती वाढत गेली. आता हा सगळाच भाग धायरी या नावाने ओळखला जातो आणि जिथे हे रस्ते मिळतात त्या कोप-याला धायरी फाटा म्हणायला लागले आहेत.

त्या रस्त्यावर अनेक जुनी, नवी देवळे आहेत. फाट्याजवळ आधी गारमाळ नावाची वस्ती लागते. तिथून पुढे गेल्यावर नवशा गणपतीचे देऊळ लागते त्या भागाला गणेशनगर म्हणतात. आणखी पुढे गेल्यावर लागणा-या चौकात उंब-या गणपतीचे देऊळ लागते. तिथून एक रस्ता उजवीकडे डी एस के विश्व, नांदेड गाव वगैरेकडे जातो आणि दुसरा डावीकडे बेणकर वस्ती, रायकर मळा, न-हे गाव वगैरेंकडे जातो. चौकात न वळता समोर थोडेसेच पुढे गेल्यावर भैरवनाथाचे मोठे मंदिर आहे. तिथून जुने धायरी गांव सुरू होते. धायरी ग्रामपंचायतीची हद्द आणि पुणे महापालिकेची हद्द दाखवणारा एक लहानसा फलक त्या रस्त्याच्या कडेला दिसतो. तो दिसला नाही तर आपल्याला काहीही फरक जाणवत नाही इतके पुणे महानगरपालिका आणि धायरी ग्रामपंचायत हे आता सलग झालेले आहेत. धायरी गांवाचा जुना भाग अजूनपर्यंत पुणे महानगराच्या सीमेपलीकडे असला तरी आतासुध्दा पी एम पी एल बसेस धायरी गावात जातातच, लवकरच पूर्ण धायरी भाग पुणे शहरात विलीन होणार असल्याची घोषणा झाली आहे.

या धायरी रस्त्याला दोन्ही बाजूंना फुटत जाणा-या गल्ल्यांना १, २, ३, ४ असे क्रम दिले आहेत. त्यामुळे पत्ता सापडणे सोपे आहे. या गल्ल्यांना एकमेकांना जोडणारे रस्तेच नाहीत. त्यामुळे या भागात गल्लीबोळांचे जाळेही नाही. एकाद्या उभ्या सरळसोट झाडाला आडव्या फांद्या फुटत जातात आणि त्या एकमेकांपासून दूर दूर जातात तशी या गावाची रचना आहे. एका गल्लीमधल्या टोकाच्या घरामधून शेजारच्याच गल्लीच्या टोकाच्या घरी जायचे असेल तर मुख्य रस्त्यापर्यंत येऊन तिकडे जावे लागते. आमचे घर धायरी गांवाकडे जाणा-या या रस्त्यावरील अशाच एका गल्लीच्या टोकाशी आहे.
............. (क्रमशः)
-------------------------------------------------------------------------------------

No comments: