Sunday, October 20, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ९ - श्रीराम परांजपे ( एस.आर.परांजपे )

इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण होताच माझी अणुशक्ती खात्यात निवड झाली आणि त्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये माझे प्रशिक्षण सुरू झाले. त्याची सुरुवात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स यासारख्या विज्ञानाच्या मूलभूत शाखांच्या शिक्षणापासून झाली. निसर्गाच्या कोणत्या नियमांमुळे आणि सिध्दांतानुसार अणुशक्ती निर्माण होते याचे फिजिक्स, ती कोणकोणत्या नैसर्गिक पदार्थांपासून होते याची केमिस्ट्री आणि ते सगळे किती प्रमाणात होते याचे गणित समजून घेण्यासाठी त्याच्या संबंधातली इत्थंभूत पायाभूत माहिती असायला हवी हा यामागचा दृष्टीकोण असावा. विज्ञान आणि गणित हे विषय मला शाळेत असतांनापासून आजपर्यंत प्रिय असले तरी महत्प्रयासाने इंजिनियरिंगची डिग्री घेतल्यानंतर त्यावर काहीतरी प्रत्यक्ष काम करण्याची मी आतुरतेने वाट पहात होतो. त्यामुळे या सैध्दांतिक किंवा पुस्तकी शिक्षणासाठी त्या वेळी आमच्यापैकी कोणीच फारसा उत्सुक नव्हता.

आम्हाला हे विषय शिकवणारे कोणतेही शिक्षक कॉलेजातले प्रोफेसर नव्हते. आमच्याहून पाच सहा वर्षे वयाने मोठे आणि एकच ग्रेड वरच्या हुद्द्यावर आमच्याच खात्यात काम करणारे निरनिराळे अधिकारी येऊन थोडा थोडा भाग शिकवून जात होते. त्या काळातले आमचे ट्रेनिंग स्कूल मुंबईतल्या मरीन लाइन्सवर होते आणि आमच्या लेक्चरर्सना तिथे येण्याजाण्यासाठी ऑफिसचे व्हेइकल कधी मिळाले तर मिळत असे, कधी मिळतही नसे. त्या काळातल्या लालफितीमधून टॅक्सीभाड्याचे ऱिइंबर्समेंट मिळवणे फार जिकीरीचे काम होते आणि त्या काळातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चांगली नव्हती. शिवाय मुलांना शिकवणे हे त्या लोकांचे मुख्य काम नव्हतेच. यामुळे त्यांच्यातल्या काहीजणांना या कामात मनापासून रस वाटत नसे. केवळ नोकरीचा भाग म्हणून ते लोक हा जुलमाचा रामराम करून जात. कधी कधी ते मरीन लाइन्सला येऊच शकत नसत आणि त्यांना दिलेला पोर्शन उरलेल्या पीरियड्समध्ये कसाबसा कव्हर करून टाकत असत. आमच्या बॅचमधली बहुसंख्य मुले मुंबईबाहेरून आलेली होती, त्यांच्या हातात पहिल्यांदाच त्यांच्या हक्काचे पैसे पडत होते, ट्रेनिंगच्या सुरुवातीला बराचसा मोकळा वेळही मिळत होता. यामुळे आम्ही बहुतेक सगळी मुले जमेल तेवढी आपापल्या जिवाची मुंबई करून घेत होतो. असा सगळा आनंद होता. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग हा नवा विषय सुरू होणार असल्याची बातमी येतांच सर्व मुलांना खूप आनंद झाला. आपल्याला आता काही तरी प्रत्यक्ष कामाचे शिकायला मिळेल असे सर्वांना वाटले. त्यासाठी एस.आर.परांजपे नावाचे लेक्चरर येणार असल्याचे समजले आणि मराठीभाषी मुले जरा जास्तच खूष झाली. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पहिल्या पीरियडची वेळ झाली तरी परांजपे सर आले नव्हते. त्यांच्या आगमनाची आणखी पाच दहा मिनिटे वाट पहायची आणि जवळच्या इराणी किंवा उडपी हॉटेलात किंवा मरीन ड्राइव्हच्या मसुद्गकिना-यावर जाऊन बसायचे असे आमचे बोलणे चालले असतांनाच ते धावतपळत आणि कपाळावरला घाम टिपत टिपत क्लासरूममध्ये येऊन धडकले. शिडशिडीत शरीरयष्टी, जाड भिंगांचा आणि जाड फ्रेमचा चश्मा, चेहे-यावर भोळसट वाटावा इतका सौम्य भाव वगैरेंमुळे त्यांचे पहिले इम्प्रेशन काही फारसे चांगले उमटले नाही. वयाने आणि हुद्द्याने ते आमच्यापेक्षा निदान बारा तेरा वर्षांनी सीनियर असले तरी आपण मोठे ऑफिसर असल्याचा कसलाच रुबाब त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात दिसला नाही. त्या वेळी तर ते एकाद्या म्युनिसीपालिटीच्या शाळेतल्या मास्तरासारखे दिसत आणि वावरत होते, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि पहिल्याच वाक्याच्या एका शब्दात अडखळून न्नन्नन्नन्न असा चमत्कारिक उच्चार यायला लागल्यावर तर मुलांची साफ निराशा झाली.

मागच्या बाकावर बसलेल्या मुलांची कुजबूज वाढून त्याला गोंगाटाचे रूप आले, तरीही सरांनी तिकडे अजीबात लक्ष न देता त्यांचे किंचित तोतरे बोलणे चालूच ठेवले. त्यांनी बहुधा पूर्वीच्या काही बॅचेसनाही शिकवले असावे आणि त्यांना या सगळ्याची संवय झाली असणार. समोरच्या बेंचांवर बसलेल्या मुलांवर आपले लक्ष केंद्रित करून त्यांनी शांतपणे आपला विषय शिकवायला सुरुवात केली. परांजपे सरांनी त्यासाठी भरपूर पूर्वतयारी केलेली होती. विषयावर तर त्यांचे प्राभुण्य होतेच, त्यासंबंधीची सर्व इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे त्यांच्या अगदी नखाग्रांवर (फिंगरटिप्सवर) होती. त्याची सुरेख प्रकारे मांडणी करून ती मनोरंजक पध्दतीने सांगायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर मात्र बाकीची मुलेही त्यात गुंगून गेली.

बिलियर्डमधल्या चेंडूसारखा सारखा एक न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या एका अणूला धडकतो आणि त्याचे विखंडन करून त्यातून आणखी न्यूट्रॉन जन्माला येतात, ते पुढे आणखी युरेनियमच्या अणूंचे विखंडन करत जातात अशा प्रकारचे सोपे चित्र न्यूक्लियर फिजिक्स शिकत असतांना आमच्या मनात तयार झालेले होते. प्रत्यक्षातल्या रिअॅक्टरमध्ये युरेनियमचे कित्येक परार्ध अणू वास करत असतात. आणि दर सेकंदाला कित्येक अब्ज न्यूट्रॉन येऊन युरेनियमच्या निरनिराळ्या अणूला धडकत असतात किंवा इतर पदार्थांमध्ये ते शोषून घेतले जात असतात, क्षणोक्षणी जन्माला येऊन लगेच नष्ट होणा-या न्यूट्रॉन्सचा एक महाप्रचंड घोळका रिअॅक्टरमध्ये घोंघावत असतो हे एक वेगळे चित्र परांजपे सरांनी छान उभे केले. १९४२ साली डॉ.एन्रिको फर्मीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या पहिल्या पाईलपासून ते पुढील दोन शतकांमध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या प्रयोगांमधून अणुशक्तीचा विकास कसा होत गेला, गोल, चौकोनी, षट्कोनी, उभे. आडवे, लांबट, बसकट वगैरे निरनिराळ्या आकारांचे असंख्य प्रकारचे लहानमोठे रिअॅक्टर्स अनेक देशांमध्ये तयार केले गेले, त्यातले काही चालले, बरेचसे चाललेच नाहीत, युरेनियम, प्ल्युटोनियम यासारखी इंधने आणि त्यांच्या जोडीला साधे पाणी, जड पाणी (हेवीवॉटर), कार्बन डायॉक्साइड, सोडियम वगैरे पदार्थांचा उपयोग त्यात कसा केला गेला, त्यांचे परिणाम काय झाले, वगैरेंचे सुसंगत आणि सविस्तर असे वर्णन त्यांनी केले. हा विषय रोचक होताच, परांजपे सरांनी तो फारच चांगल्या रीतीने समजावून सांगितला. ते करता करता अमेरिका, रशीया, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा वगैरे देशांनी त्यातल्या निरनिराळ्या पध्दतींवर जास्त भर का दिला आणि भारताच्या दृष्टीने त्यातले काय शिकण्यासारखे आणि फायद्याचे आहे हेसुध्दा ते सांगत गेले. त्यांनी जे काही सांगितले ते सर्वांच्या स्मरणात पक्के रुतून बसले.

लेक्चर झाल्यानंतरसुध्दा परांजपेसर थांबून रहात, मुलांनी विचारलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर देतांना त्याचे समाधान होईपर्यंत त्याचे विवेचन करून समजावून सांगत. काही मुले अवांतर प्रश्नही विचारत. त्या काळात फॉरेनला जाण्याची प्रचंड क्रेझ होती कारण ती संधी फार थोड्या लोकांना मिळत असे. त्यामुळे "सर, तुम्हाला कधीतरी फॉरेनला जायचा चान्स मिळाला का हो?" अशी जराशी तिरकस पृच्छा एका वात्रट मुलाने करताच "निदान सात आठ वेळा तरी मी कुठे कुठे जाऊन आलो असेन." असे त्यांनी अगदी शांतपणे सांगताच वर्गातल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अणुशक्ती खात्यात ते किती मोठ्या पोस्टवर आहेत याची तोपर्यंत कोणाला कल्पनाच नव्हती. "आमचे ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का?" असे काही मुलांनी त्यांना विचारल्यावर सरांनी त्यांनाच उलट विचारले, "तुम्हाला चेस आणि ब्रिज खेळायला येते का?" हे ऐकून सगळे गारेगार झाले. परांजपे सर ज्या प्रकल्पावर काम करत होते तो मंजूरीसाठी बराच काळ सरकार दरबारी रखडत पडला असल्यामुळे त्यावर काम करणा-या लोकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडला होता असा त्याचा अर्थ होता असे नंतर कळले. 

रिअॅक्टर इंजिनियरिंग या विषयाचा जेवढा भाग परांजपे सरांना दिला होता तो शिकवून संपल्यावर पुढील भागांसाठी त्यांच्या ऐवजी त्यांचेच सहकारी दिवेकर सर आले. त्यानंतरच्या काळात अणुशक्ती विभागाच्या काही कार्यक्रमांमध्ये परांजपे सर आम्हाला अधून मधून भेटत, दर वेळी त्यांना नमस्कार करताच तेसुध्दा लगेच ओळख दाखवून आमची विचारपूस करत. असा जवळ जवळ दीड वर्षांचा काळ उलटून गेला आणि परांजपे सरांचा फास्ट ब्रीडर टेस्ट रिअॅक्टर (एफबीटीआर) मार्गाला लागल्याची बातमी आली. हा प्रकल्प फ्रान्सच्या सहाय्याने उभारला जाणार होता. तोपर्यंत परांजपे सरांच्या हाताखाली काम करणारा एक लहानसा सेक्शन होता. पण प्रॉजेक्टचे काम पाहण्यासाठी त्याचा खूप मोठा विस्तार करावा लागणार होता. त्यामुळे बीएआरसीमधल्या अनेक लोकांनी त्यात सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आनंद दीक्षित आणि रवीन्द्र काळे या माझ्या मित्रांचीही त्यात निवड झाली. त्यातल्या दीक्षितच्या बरोबरच मी त्या काळात एका फ्लॅटमध्ये रहात होतो. त्यामुळे "एसआरपींनी आज हे केले, ते केले, असे सांगितले, तसे सांगितले ..."  वगैरे मधून त्यांचा उल्लेख आमच्या रोजच्या बोलण्यात होऊ लागला आणि त्यामधून त्यांची एक आणखी वेगळी प्रतिमा मनात तयार होत गेली.

ते नुसते बोलघेवडे शिक्षक नव्हते, कोट्यवधी रुपये खर्चाच्या एका मोठ्या प्रॉजेक्टची संपूर्ण जबाबदारी पेलण्याची क्षमता त्यांच्यात होतीच. त्याचे सारे सविस्तर प्लॅनिंग, त्यात पडणारी कामे आणि त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची जुळवाजुळव करणे, त्यानंतर ती कामे सुयोग्य सहाय्यकांना वाटून देणे, त्यांच्यामध्ये सामंजस्य राखणे ही महाकर्मकठीण कामे ते व्यवस्थितपणे सांभाळत होते. अणुशक्तीखात्यात आणि बाहेरील अनेक वरिष्ठांशी त्यांच्या चांगल्या ओळखी होत्या. ते वरून जेवढे साधेसुधे दिसायचे तेवढेच पक्के आतल्या गाठीचे होते. त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे सहजासहजी कोणाला कळून देत नसत. त्यांच्या काही आवडीनिवडी होत्या, छंद होते, त्यातला एक होमिओपाथी हा होता. असे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू त्यामधून समोर येत गेले. ठरल्याप्रमाणे त्यांच्या टीमसह ते वर्षभरासाठी फ्रान्सला जाऊन आले आणि लवकरच कल्पकमला चालले गेले. त्यानंतर त्यांची भेट होण्याचे योग दुर्मिळ होत गेले. त्यांचे सहकारी असलेले माझे अनेक जुने मित्र या ना त्या कारणाने कुठे ना कुठे भेटत असत तेंव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये परांजपे सरांचा नेहमी उल्लेख येतच असे. अखेरीस संचालक या पदावरून सेवानिवृत्त होऊन ते कल्याणला सेटल झाले असल्याचे त्यामधून समजले.

त्यालाही जवळ जवळ वीस वर्षे होऊन गेली. कालांतराने माझे ते मित्र आणि मी स्वतः रिटायर होऊन निरनिराळ्या शहरांमध्ये राहू लागलो. आमच्याही गाठी भेटी कमी होत गेल्या आणि झाल्या तरी आता त्यात एसआरपींचा (श्रीराम परांजपे यांचा) विषय निघणे बंद होऊन गेले. ते नाव हळूहळू विस्मरणात जात चालले होते. अचानक लोकसत्तामधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती त्यांच्या दुःखद निधनासंबंधीची होती आपली स्मृती मागे ठेऊन ते पुढे चालले गेले होते, आता यानंतर ते आता कधीच प्रत्यक्षात दिसणार नाहीत. 

--------------------------------

No comments: