Friday, August 23, 2013

होडी ते पाणबुडी आणि ..... मी


'नदीपार जाण्यासाठी आणि नद्यांच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापारपासून लहान होड्यांचा उपयोग होत आला आहे. भारतातल्या बहुतेक सर्व मोठ्या नद्यांवरसुध्दा आता जागोजागी पूल बांधले गेले आहेत आणि खेडोपाडी जाणारे रस्ते झाले आहेत. माझ्या लहानपणी तसे नव्हते. जमखंडी गावातल्या आमच्या राहत्या घरापासून आमचे वडिलोपार्जित घर आणि शेतजमीन असलेल्या मूळ खेडेगावापर्यंतचे अंतर फक्त वीस किलोमीटर होते, पण घरातून निघून तिकडे जाऊन पोचण्यासाठी एक पूर्ण दिवस लागत असे, कारण दोन्ही गावांच्यामध्ये कृष्णा नदीचा प्रवाह होता आणि तिच्या दोन्ही बाजूंना पक्के रस्तेही नव्हते. जिथपर्यंत रस्ता जात होता तिथपर्यंत बसमधून गेल्यानंतर पुढे चालत जाऊन नदी पार करून पलीकडे जायचे आणि पुन्हा थोडे अंतर चालत जाऊन पुढे जाण्यासाठी दुसरी बस मिळेल तेंव्हा पकडायची असे सोपस्कार करावे लागत.

कृष्णामाईच्या तीरावर गेल्यानंतर तिथेसुध्दा नावेची वाट पहात बसावे लागत असे. घरून आणलेले डबे तिथल्या रम्य जागी उघडून आणि केळी, पेरू वगैरे त्याबरोबर खाऊन आम्ही पिकनिकचा आनंद घेत असू. त्यातही पावसाळ्यात जेंव्हा नदीला महापूर येई तेंव्हा तिला येऊन मिळणा-या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी शिरून त्यांचे रूपांतर दोन तीन उपनद्यांमध्ये होत असे आणि एरवी नावेत चढण्या व उतरण्यासाठी ठरवलेल्या जागा पाण्याखाली जाऊन अदृष्य होत असत. प्रचंड वेगाने खळखळाट करत जात असलेल्या पाण्याच्या रौद्र रूपाच्या त्या प्रवाहात नाव चालवण्याचे धाडस कुणी करत नसे आणि कोणा धीट माणसाने ते केलेच तरी त्याला उतारू मिळणे अशक्य असल्यामुळे तिथली (आताच्या भाषेतली) 'फेरी सर्व्हिस' पावसाळ्यात बंद रहात असे. त्या नदीनाल्यांना नावेमधून पार करून पलीकडे जाणे तेवढ्या काळात शक्यच नव्हते. पलीकडचे लोक पलीकडे आणि अलीकडचे लोक अलीकडे रहायचे. उगारला असलेला रेल्वेचा पूल तेवढा बारा महिने पाण्याच्या वर असे. त्यामुळे फारच निकडीची गरज असल्यास दीडदोनशे किलोमीटरचा वळसा घालून उगार शेडबाळ अथणीमार्गे जावे लागत असे. पण इतर दिवसात मात्र आम्ही नावेत बसून मजेत कृष्णा नदी पार करत असू.

ती नाव सुमारे आठदहा मीटर लांब आणि मधोमध तीन चार मीटर रुंद एवढी मोठी असायची. माणसे, त्यांची गाठोडी, सायकली आणि कोंबड्या वगैरे त्यात जितके भरता येतील तेवढे भरून त्यांना नावेमधून पलीकडे नेले जात असे. पहिल्या फेरीत न मावल्यामुळे उरलेले लोक नावेला पलीकडच्या तीरावर जाऊन परत येण्याची शांतपणे वाट पहात बसत. क्वचित प्रसंगी एक एक करून त्यावरून बैलगाड्यासुध्दा पलीकडे जाऊ शकत. कारवारजवळील एका ठिकाणी तर एस.टी.च्या बसलासुध्दा मोठ्या नावेमधून नदीच्या पार नेतांना मी पाहिले आहे. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून आणि नावेचा समतोल राखण्यासाठी माणसांना खाली उतरवून त्यांना आणि गाड्यांना वेगवेगळ्या फे-यांमध्ये नावेतून नेले जात असे. बैलांनी नावेवर दंगा गोंधळ करू नये म्हणून त्यांना मात्र नावेच्या बाजूने पाण्यामधून पोहवत पलीकडे नेत असत. गायी म्हशींनासुध्दा लांब दोरीने बांधून नावेच्या सोबत पाण्यामधून पोहत नेत असत.

नदीच्या पात्रामधील पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन नावेत चढण्या उतरण्यासाठी जागा ठरलेल्या होत्या. पण तिथे पक्के बांधकाम केलेले धक्के नव्हते. ती नाव नदीकिना-यापासून दूर कंबरभर पाण्यात उभी रहात असे आणि माणसांनी आपले सामान डोक्यावर धरून पाण्यामधूनच तिथपर्यंत चालत जाऊन नावेत चढायचे असे. कोणी ना कोणी धडधाकट उतारू  लहान मुलांना उचलून नेत असे. नावेच्या कडांवर दोन्ही बाजूंना मोठमोठी वल्ही बसवलेली असत आणि बलदंड नावाडी "हुश्शा हुय्या" करत जोर लावून ती चालवत. उन्हाळ्यात नदीचे पाणी फारच कमी असले तर पलीकडे जाण्यासाठी एक लहान नाव असायची आणि लांब बांबूच्या सहाय्याने नदीच्या तळाला रेटा देऊन नावेला ढकलतच पार करत असत. अशा प्रकारचा नावेमधला प्रवास मी लहान असतांना अनेक वेळा केला असल्यामुळे माणसांच्या हातांच्या जोराने चालवलेली होडी माझ्या ओळखीची झाली होती.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये तर आमचाच बोटक्लब होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर केंव्हाही वाटले की एकाद दोन मित्रांसोबत आम्ही तिकडे जात होतो आणि स्वत-च होडी चालवून तिथल्या शांत पाण्यावर तरंगत राहण्याची मजा घेत होतो. यात मजेबरोबर चांगला व्यायामही होत असल्याने चांगली सडकून भूक लागत असे आणि मेसमधले जेवण अमृततुल्य वाटत असे. पुढे मुंबईला आल्यावर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळून चालणा-या मोटरलाँचमध्ये बसून वेळ असल्यास घारापुरी (एलेफंटा) बेटापर्यंत आणि नसेल तर आजूबाजूच्या समुद्रात फेरफटका मारून आणणे हा मुंबईदर्शनाचा आवश्यक भाग झाला होता. आमच्याकडे येऊन गेलेल्या बहुतेक सगळ्या पाहुण्यांना आम्ही हा जलविहार घडवून आणलाच, शिवाय मित्र, सहकारी, शेजारी वगैरेंच्या निरनिराळ्या ग्रुपमधून घारापुरी बेटाची सहलही केली.

एकदा सात आठ मित्रांचे आमचे टोळके एलेफंटाहुन परत येत असतांना आमच्याच लाँचमध्ये थोड्या अंतरावर आठ दहा समवयस्क मुलींचा एक वेगळा ग्रुप बसला होता. वेळ घालवण्यासाठी आम्ही गाणी म्हणायचे ठरवले, आमच्या ग्रुपमधल्या एक दोन मुलांचे आवाज चांगले होते, त्यांना आवडही होती आणि अनेक गाणी तोंडपाठ होती. त्यांनी गाणी म्हणणे हा आमच्या मेळाव्यांमधला नेहमीचाच भाग होता. पण आम्ही जसे ठरवले तसेच त्या मुलींनीही गाणी गायचे ठरवले. सर्वात आधी याची सुरुवात कुणी केली ते सांगता येणार नाही. सुरुवातीला एकेक जणच आपापल्या कंपूसाठी गाणे म्हणत होता किंवा होती, पण दोन्ही ग्रुपमधल्यांना एकमेकांची गाणी ऐकू येतच होती. त्यामुळे आपला आवाज मोठा करण्यासाठी त्यात इतरांनी साथ द्यायला सुरुवात केली, त्यातून मग एक प्रकारची चढाओढ सुरू झाली, गाण्यांमधूनच सवालजवाब, उत्तरेप्रत्युत्तरे होत गेली. अतीशय सभ्य आणि सुसंस्कृत स्वरूपाचा आमचा हा धिंगाणा आमची लाँच गेटवेच्या धक्क्याला लागेपर्यंत चालला. तो इतका रंगत गेला की एरवी कधी गाण्यासाठी तोंडही न उघडणारे मित्रसुध्दा शेवटी शेवटी बेंबीच्या देठापासून किंचाळायला लागले होते. इतर प्रवाशांची त्यामुळे चांगली करमणूक झाली असेल. उतरल्यानंतर आम्ही दुरून हात हालवूनच मुलींच्या टोळीचा निरोप घेतला आणि त्यांनीही गोड हंसून दिला. त्या कोण होत्या, कुठून आल्या होत्या कोण जाणे, पण नावेमधल्या त्या लहानशा प्रवासाची एक अविस्मरणीय अशी सुखद आठवण मनात ठेऊन गेल्या.

आम्ही प्रत्यक्षात काश्मीरला जाण्यापूर्वी हिंदी सिनेमांमधून जेवढे काश्मीर पाहिले होते त्यात नौकाविहार आणि बर्फामधून घसरत जाणे हेच लक्षात राहिले होते. आम्ही स्वतः श्रीनगरला गेलो तेंव्हा दोन प्रवाशांना सरोवरात विहार करवून आणणारी छोटीशी नाव पाहिली, तिच्यात बसून फिरून आलो आणि राहण्याच्या सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली हाउसबोटही पाहिली. दल सरोवरातून फेरफटका मारत असतांना तिथे नावांमधून फुले, फळे, भाज्या, शोभेच्या वस्तू वगैरे गोष्टी होडीत बसूनच विकणारे फिरते विक्रेते असलेला बाजारसुध्दा पाहिला. चिनाब नदीवर एक बंधारा घालून दल सरोवर निर्माण केले आहे आणि त्यातले पाणी वाहून जाऊ नये यासाठी ते नियंत्रित स्वरूपात नदीत सोडले जाते. बहुतेक सगळ्या नावा मात्र नदीच्या खालच्या अंगाला ठेवलेल्या असतात. नदीचे पात्र आणि सरोवर या दोन्हींच्या मध्ये एक लहानसे कुंड आहे. त्याला दोन्ही बाजूंना घट्ट बसणारे दरवाजे आहेत. नदीमधून सरोवरात जायचे असल्यास आधी बाहेरचा दरवाजा वर उचलून नावांना त्या कुंडात घेतात आणि तो दरवाजा घट्ट बंद करतात. सरोवरातले पाणी तिथे सोडून तिथल्या पाण्याची पातळी वाढवतात. ती सरोवराइतकी झाल्यानंतर आतल्या बाजूचे गेट उघडून त्या नावांना सरोवरात जाऊ देतात. बाहेर येतांना याच्या उलट क्रमाने कृती करतात. असे करून सरोवर आणि नदीचे पात्र यातल्या पाण्याच्या लेव्हल्स वेगवेगळ्या ठेवल्या जातात. पण यामुळे नौकाविहार करणा-या पर्यटकांना आत जातांना तसेच बाहेर येतांना बराच वेळ लहानशा जागेत ताटकळत थांबावे लागते.

जबलपूरजवळ असलेला भेडाघाटचा धबधबा आणि तिथून दोन तीन किलोमीटरपर्यंत असलेला नर्मदा नदीचा प्रवाह खूप प्रेक्षणीय आहे. या भागातला डोंगरच संगमरवरी दगडांचा आहे. नर्मदेच्या त्या भागातल्या प्रवाहातून नावेत बसून विहार करण्याची चांगली सोय आहे. नदीचे पात्र खूप रुंद नसले तरी ब-यापैकी आहे, अत्यंत निर्मळ आणि पारदर्शक असे पाणी आणि दोन्ही बाजूला संगमरवरी पहाडांच्या उंच कड्यांची शोभा पहात त्या बोटीमधून जातांना खूप मजा येते. माझ्या कुटुंबीयांसोबत तर मी अनेक वेळा ही मौज लुटलेली आहेच, एकदा एका सेमिनारसाठी जबलपूरला गेलो असतांना तिथे आलेल्या फॉरीन पार्टिसिपेंट्सच्यासोबतही हे भ्रमण करायचा योग आला होता. त्या मोटर लाँचेसचे नावाडी अत्यंत गंमतशीर असी कॉमेंटरी हिंदी भाषेत करतात. त्या दिवशी सुध्दा त्यातल्या कोणाला इंग्रजीत बोलता येत नव्हते. त्यामुळे मलाच दुभाषा बनून त्यांनी सांगितलेल्या गमतीजमतींचे जमेल तेवढे भाषांतर करून सांगावे लागले होते. शिवाय भारतीय परंपरांबद्दल माहिती देऊन त्याचा अर्थ थोडा समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागत होता.

आम्ही केलेल्या युरोप आणि अमेरिकेच्या सहलींमध्येसुध्दा क्रूज हा एक महत्वाचा भाग असायचा. त्यात आधुनिक पध्दतीच्या आलीशान बोटी पहायला मिळाल्या. थेम्स नदीतून जातांना दोन्ही बाजूंना दिसणारे जुने आणि नवे लंडन आणि सीन नदीमधून नावेतून फिरतांना पॅरिसमधल्या ऐतिहासिक आणि आधुनिक इमारती बाहेरून पाहिल्या. पाण्यातच उभारलेला व्हेनिस शहराचा जुना भाग दोनचार शतकांपूर्वी जसा होता तसाच अद्याप ठेवला आहे. या भागात रस्ते नाहीतच, सगळी घरे कालव्यांनी जोडलेली आणि सगळीकडे होडीमधूनच फिरायचे. आम्हीसुध्दा जुन्या वाटणा-या पण मोटरवर चालणा-या एका लहानशा नावेत बसून व्हेनिसच्या अरुंद गल्लीबोळामधून भटकंती करून घेतली, पण सिनेमात किंवा फोटोत दिसतो तसा तो भाग प्रत्यक्षात प्रेक्षणीय तर वाटला नाहीच, उलट दुर्गंधाने भरलेला, गलिच्छ आणि किळसवाणा वाटला. पर्यटन करतांना काही जागी अशी निराशा होत असते. अॅमस्टरडॅम हे शहरसुध्दा खाड्या आणि कालवे यांनी भरलेले आहे. तिथली बोटराईड मात्र छान होती. हॉलंड या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे. समुद्राला जेंव्हा भरती येते तेंव्हा तिथल्या नद्या, खाड्या वगैरे जिथे समुद्राला मिळतात त्या ठिकाणी त्यांच्या पाण्याची पातळी समुद्रापेक्षा खाली असते. त्या वेळी त्यात समुद्राचे पाणी उलट दिशेने शिरू नये म्हणून बंधारे, गेट्स आणि झडपा वगैरेंची बरीच गुंतागुंतीची व्यवस्था केलेली आहे. श्रीनगरच्या दल लेकमध्ये नावांना आत शिरण्याची आणि बाहेर पडण्याची जशी योजना आहे त्याच प्रकारची पण खूप मोठ्या प्रमाणावर केलेली योजना अॅमस्टरडॅम बंदरात मोठमोठ्या जहाजांसाठी कार्यरत आहे.  

सिंदबादपासून ते कोलंबस, वास्कोडिगामा करत करत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजींपर्यंत अनेकांनी केलेल्या समुद्रातल्या प्रवासाची वर्णने मी लहानपणी खूप चवीने वाचत असे. "हा सुवेझ कालवा, थक्क करील मानवा।।" यासारख्या कविताही शाळेतल्या पुस्तकांमध्ये होत्या. आपणही एकदा मोठ्या जहाजामधून प्रवास करून पाहण्याची सुप्त इच्छा त्या वर्णनांमधून मनात येत होती. पण ती काही पूर्ण झाली नाही. मला परदेशी जाण्याची संधी मिळेपर्यंत तो प्रवास विमानानेच करायचा हे रूढ झालेले होते, प्रवासात अनेक दिवस घालवण्याची तयारी आणि इच्छा कोणाच्या मनात असली तरी तशी सोयच तोपर्यंत बंद झाली होती. पुढे माझे काही मित्र आणि आप्त आगबोटीने जाऊन अंदमानची सहल करून आले, पण या बाबतीतही मला जरा उशीरच झाला.      

दर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल दिन साजरा करतात. त्या दिवशी मुंबई बंदरातली एक युध्दनौका आम जनतेला पाहण्यासाठी खुली परवानगी दिलेली असते. याविषयी अनेक वेळा ऐकल्यामुळे एका वर्षी आम्ही ती नाव पहायला गेलो. ती पहायला त्या दिवशी आलेल्या लोकांची जवळ जवळ गेट वे ऑफ इंडियापर्यंत लांब रांग लागली होती, पण ती हळू हळू पुढे सरकत होती हे पाहून आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो. हळू हळू पुढे सरकत तासाभरात लायन गेटपर्यंत जाऊन पोचलो. आत गेल्यानंतर पुन्हा तितकीच लांब रांग डॉकच्या आतमध्ये होती. ते चालत चालत जाऊन आणखी एक तासानंतर आम्ही एका फ्रिगेटवर चढलो. तिथला फक्त डेकच लोकांना पहाण्यासाठी खुला ठेवला होता. त्यावर एक दोन तोफा बसवलेल्या होत्या. बाकीची केबिन्स आणि इतर सर्व जागा कड्याकुलुपांमध्ये बंद होत्या. इतर प्रेक्षकांना कदाचित त्यात रस नसेल, पण माझ्यातला मेकॅनिकल इंजिनियर जागा असल्यामुळे मला तिथली यंत्रसामुग्री पहाण्याची खूप इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. पाच मिनिटात त्या युध्दनौकेच्या रिकाम्या आणि सपाट डेकवर एक प्रदक्षिणा घालून आम्हाला खाली उतरावे लागले. तिरुपतीच्या व्यंकटेशाचे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे रहावे आणि ते घेतल्यानंतर एक सेकंदात पुढे ढकलले जावे तसे झाले. 

आगबोटी तयार करण्याचा माझगावच्या गोदीतला कारखाना पहाण्याची एक संधी मला मिळाली, तेंव्हा तिथे काही युध्दनौकांची बांधणी चाललेली होती. शिंप्याने शर्ट पँट्सची कापडे खुणा करून कराकरा कापावीत तेवढ्या सहजतेने तिथे अवाढव्य आकारांचे पोलादाचे पत्रे कापले जात होते. त्यांच्या ड्रॉइंग्जची फिल्म एका प्रोजेक्टरमध्ये लावलेली असे आणि त्या पत्र्यांवर आधी अंधार करून ते प्रकाशचित्र प्रोजेक्ट करून खडूने गिरवून घेतले जात होते. अशा प्रकारची यंत्रणा मी कुठेच पाहिली नव्हती. पुढे एका यंत्राला जोडलेल्या टॉर्चने त्या पत्र्यांचे चित्रविचित्र आकारांचे तुकडे त्यांच्या ड्रॉइंगप्रमाणे कापले जात होते. पंधरावीस मिलिमीटर आणि त्यापेक्षाही जाड पत्र्यांचे आणि त्यांना कापून तयार केलेल्या मोठमोठ्या आकारांचे ढीग पाहूनच हे काम किती मोठे असते याची कल्पना येत होती. ते तुकडे एकमेकांना जोडण्याचे कामसुध्दा स्वयंचलित यंत्रांकडूनच चालले होते. अर्थातच ती यंत्रे चालवण्यासाठी कुशल कामगार तिथे तैनात होतेच. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे वेल्डिंग मी त्यानंतरही पुन्हा कधी पाहिले नाही. त्या कारखान्यात काही युध्दनौकांचे सांगाडे उभे होते, तर काहींवर इतर उपकरणे बसवण्याचे काम चालले होते. ते सगळे वरवर पाहूनसुध्दा त्यांचे आकार (साइझ) आणि त्यातली गुंतागुंत (कॉम्प्लेक्सिटी) यांची कल्पना आली.  

अणुशक्तीवर चालणा-या भारतीय बनावटीच्या पहिल्या पाणबुडीच्या रिअॅक्टरचे काम अणुशक्ती खात्यामध्ये होत होते. याबाबत अत्यंत कडक गोपनीयता पाळली जात असल्यामुळे ते कोणाकडे होते हे कधीच समजू दिले जात नसले तरी कुठेतरी तशा प्रकारचे काम चालले असल्याची अस्पष्ट कुणकुण कानावर येत होती. बाहेरच्या ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यात रिअॅक्टरशी संबंधित असलेले भागही असायचे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती किंवा भोंगळ वाटणारी नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून ते समजू शकणा-यांना थोडा अंदाज येत होता. अणुशक्तीसाठी उपयोगात येणारी सर्वच उपकरणे आणि यंत्रसामुग्री निर्माण करतांना त्या कामात विशेष प्रकारची काळजी घेतली जाते. त्यासाठी लागणारी प्रोसीजर्स, स्पेसिफिकेशन्स वगैरे एकदम वेगळी असतात. ती तयार करून त्यानुसार या कारखान्यांमध्ये सगळे काम करवून घेण्याची सुरुवात आमच्या पिढीने केली होती. त्यापूर्वीच्या काळात तिथे साखर, सिमेंट यासारख्या कारखान्यांची यंत्रसामुग्री तयार होत असे. त्यांच्या कार्यपध्दतीत अनेक प्रकारच्या आमूलाग्र सुधारणा घडवून आणून आणि नवीन प्रकारची यंत्रसामुग्री, इन्स्पेक्शनची उपकरणे वगैरे आणून त्यांच्या कामाचा दर्जा अणुशक्तीच्या कामासाठी आवश्यक इतका उंचावण्यात आम्ही खूप मदत केली होती. या सर्वांचा उपयोग ही पाणबुडी बनवण्याच्या कामात केला जात होताच. अशा प्रकारे अप्रत्यक्ष रीतीने त्या कामाला कुठेतरी माझाही स्पर्श झाला होता. काही दिवसांपूर्वी अरिहंत या नावाच्या पाणबुडीवरील रिअॅक्टर क्रिटिकल झाल्याची बातमी वाचली तेंव्हा या आठवणी झर्रकन डोळ्यासमोर येऊन गेल्या.

होडी ते पाणबुडी यांच्या मधल्या जहाज, गलबत, आगबोट वगैरेंशी माझा कधीच संबंध आला नसला तरी होडी, नावा वगैरेंच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. खरे पाहता रेल्वे आणि विमाने यातून मी शेकडो वेळा दूर दूरचे प्रवास केले आहेत. नावेमधून एकंदर जितके किलोमीटर मी हिंडलो असेन त्याच्या कित्येकशेहेपट आगगाडीमधून आणि कित्येक हजारपट अंतर विमानांमधून कापले आहे. पण तरीसुध्दा आठवणीत राहण्यासारखे असे काही अगदी लहान लहान प्रवास नावांमधून झाले आहेत. ते या निमित्याने सादर केले.

No comments: