Friday, July 20, 2012

श्रावण शुक्रवार


आज श्रावण महिना सुरू होत आहे. घरोघरी देवघरात जिवतीच्या पटाची स्थापना करून पुढील महिनाभर त्यांची पूजा केली जाईल. या पटात इतर काही देवांची चित्रे असली तरी जिवतीला सर्वात जास्त महत्व असते, जिवतीच्या नावानेच हा पट ओळखला जातो. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी अशी तिची प्रतिमा आहे. श्रावण महिन्यामधील दर शुक्रवारी तिची पूजा करून तिला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आणि घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा असे.


श्रावण महिन्यात दररोज त्या वाराची कहाणी वाचली जात असे. त्या कहाणीमध्ये त्या वाराच्या दैवतेची कृपा कोणा भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरस गोष्ट असे. शुक्रवारसाठी दोन कहाण्या आहेत. एका कहाणीमध्ये एका गरीब स्त्रीला फसवून तिची दायीच तिचे मूल चोरते आणि त्या गावच्या निपुत्रिक राणीला ते नेऊन देते. गरीब बाईच्या पोटी वरवंटाच जन्माला आला असे ती दुष्ट सुईण तिला सांगते. या थापेवर तिचा विश्वास बसत नाही, पण ती काहीच करू शकत नसल्यामुळे नियमितपणे जिवतीची पूजा करत राहते आणि माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथे तो सुखात आणि सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करते. तिचा मुलगा राजपुत्र म्हणून थाटात वाढतो. त्याच्यावर आलेल्या संकटामधून जिवतीच्या कृपेने तो सहीसलामत वाचतो आणि अखेर त्याच्या जन्मदात्या आईला भेटतो.
दुस-या कहाणीमधील बाई दारिद्र्यात रहात असतांना तिचा भाऊ तिचा अपमान करतो. त्याने घातलेल्या गावजेवणासाठी ती आली असतांना तिला पानावरून उठवून माघारी पाठवतो. ती सुध्दा जिवतीची भक्त असते. जिवतीच्या कृपेने त्या कुटुंबाचे वाईट दिवस जाऊन त्यांना समृध्दी प्राप्त होते. त्यानंतर तोच भाऊ त्या बहिणीला सन्मानाने आपल्या घरी जेवायला बोलावतो आणि तिला पाटावर बसवून पंचपक्वांनांनी भरलेले जेवणाचे ताट तिच्यापुढे मांडतो. ती स्वाभिमानी बहीण आपले एक एक अलंकार काढून पाटावर ठेवते आणि ताटामधील पक्वांनांचा एक एक घास त्यांना देते. "हे जेवण तू यांच्यासाठीच मला दिले आहेस, माझे जेवण मी अन्नछत्रात जेवले." अशी कानउघाडणी केल्यानंतर त्या मतलबी भावाचे डोळे उघडतात.

या दोन्ही कहाण्या मला खूप आवडतात, विशेषतः दुसरी कहाणी. या बहीण भावांच्या गोष्टीत दिव्याच्या अंवसेच्या कहाणीसारख्या इतर कहाण्यांप्रमाणे कसले चमत्कार नाहीत, बोलणारे पशूपक्षी किंवा निर्जीव पदार्थ यात नाहीत. सगळ्या घटना वास्तवात घडू शकण्यासारख्या आहेत. "आईबापबंधूभगिनी, दारिद्र्यात नसते कोणी।", त्या वेळी "कुणी कुणाचे नाही।" किंवा "कठीण समय येता कोण कामास येतो।" वगैरे अन्य ऊक्तींमध्ये सांगितलेले जीवनातले कटू सत्य या कहाणीत दाखवले आहे. पहिल्या कहाणीमधलासुध्दा मोठ्या झालेल्या मुलाला पाहता क्षणी त्याची ओळखदेख नसतांनासुध्दा त्याच्या आईला पान्हा फुटतो एवढा अवास्तव भाग सोडला तर चांगल्या आणि वाईट मानवस्वभावांचेच दर्शन त्यात घडते. अर्थातच माणसाने काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन या कहाण्यांच्या तात्पर्यामध्ये मिळते.

No comments: