Wednesday, October 29, 2008

आली दिवाळी - भाग ३

नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळी आणि सकाळचा फराळ हे मुख्य भाग झाल्यानंतर दिवसभर कांही काम नसायचे. पहाटे लवकर उठल्यामुळे अर्धवट झालेली झोप पूर्ण करण्यासाठी दुपारी ताणून द्यायची. दिवेलागणी व्हायच्या सुमाराला पणत्यांच्या रांगा आणि आकाशदिवा लावायचा. एक उंच काठी उभी करून त्यावर तो लावण्यासाठी माडीवर खास व्यवस्था करून ठेवलेली होती. काठीच्या वरच्या टोकाशी झेंड्यासारखा आमचा आकाशकंदील अडकवलेला असे. त्याला बांधलेली एक दोरी सैल सोडून तो अलगदपणे खाली उतरवून घ्यायचा, त्यात पेटलेली पणती जपून ठेवायची आणि हलक्या हाताने ती दोरी ओढून हळूहळू तो दिवा वर चढवायचा हे कौशल्याचे काम होते, पण आजूबाजूच्या घरातल्या आकाशदिव्यापेक्षा आमचा दिवा जास्त उंच आहे आणि त्यामुळे दूरवरूनसुध्दा तो दिसतो याचा केवढा अभिमान त्यावेळी वाटायचा. आमचा मुख्य मोठा आकाशकंदील परंपरागत पध्दतीचाच असायचा, पण हौसेसाठी कधीकधी तारा, विमान यासारख्या आधुनिक आकारांचे दुसरे आकाशकंदील तयार करून ते दुसरीकडे लावत असू. हे सगळे कलाकौशल्याचे काम घरातच चालायचे आणि मुलेच ते करायची.
दिवाळीच्या दुसरे दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे. घरातल्या सगळ्या लोकांनी, विशेषतः स्त्रीवर्गाने नटून थटून, सजून धजून तयार होऊन बसायचे. या वेळी कोणी कोणता पोशाख आणि दागिने घालायचे हे ठरवण्याची चर्चा आधीपासून चालत असे आणि नंतर बरेच दिवस त्याचे कौतुक रंगत असे. लक्ष्मीचे चित्र असलेला चांदीचा खास शिक्का चिंचेने आणि रांगोळीने घासून चमकवून तयार ठेवलेला असे. एका पाटावर लक्ष्मीपूजनाची मांडणी होत असे. पाठीमागे कमळातल्या लक्ष्मीचे फ्रेम केलेले चित्र उभे करून ठेवायचे. चांदीच्या तबकात तो शिक्का आणि अंबाबाईची मूर्ती ठेवायची, बाजूला एक दोन दागिने मांडून ठेवायचे. समोर विड्याची पाने, त्यावर चांदीचा बंदा रुपया, सुपारी, खारीक, बदाम, नारळ वगैरेंची कलात्मक रीतीने मांडणी करायची. मुख्यतः झेंडूच्या फुलांनी सजावट करायची, त्यात अधून मधून शोभेसाठी लाल, पिवळ्या, पांढ-या शुभ्र अशा वेगळ्या रंगाची फुले घालायची. सगळे कांही व्यवस्थित असायला पाहिजे तसेच आकर्षक दिसायलाही पाहिजे. बाजूला एक घासून घासून चमकवलेली पितळेची उंच सुबक अशी समई तिच्यात अनेक वाती लावून ठेवायची. एका मोठ्या चांदीच्या ताटात पूजेची सर्व सामग्री मांडून ठेवायची. त्यात फुले, तुळस, दुर्वा, गंध, पंचामृत, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, अष्टगंध, निरांजन, उदबत्त्या, कापराच्या वड्या वगैरे सगळे सगळे अगदी हाताशी पाहिजे. पूजा सुरू झाल्यानंतर "हे नाही"," ते आणा" असे होता कामा नये आणि तसे कधीच होतही नसे. लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी त्या मोसमात बाजारात जेवढी फळे मिळत असतील ती सारी हवीतच, तसेच एरवी कधी खाण्यात नसलेल्या भाताच्या लाह्या आणि बत्तासे असायलाच पाहिजेत. त्याशिवाय लाडू, गुलाबजाम यासारखी एक दोन पक्वान्ने ठेवीत.
पंचांगात दिलेला मुहूर्त पाहून वेळेवर लक्ष्मीची षोडशोपचार पूजा होत असे. घरातली बाकीची सारी कामे आधी आटोपून किंवा तशीच सोडून देऊन पूजेच्या वेळी सर्वांनी समोर उपस्थित असायलाच पाहिजे असा दंडक होता आणि सगळेजण तो हौसेने पाळत असत. यथासांग पूजा, आरत्या वगैरे झाल्यानंतर थोडा प्रसाद खाऊन फटाके उडवायचा कार्यक्रम असे. आजकाल मिळणारे आकर्षक चिनी फायरवर्क त्यावेळेस नव्हते. फुलबाज्या, चंद्रज्योती, भुईचक्रे, कारंजे , बाण, फटाकड्यांच्या लड्या आणि लहान मोठ्या आकाराचे फटाके किंवा बाँब एवढेच प्रकार असायचे. अगदी लहान मुलांसाठी केपांच्या बंदुकी, साप वगैरे असत. वयोमानानुसार आणि आपापल्या आवडीनुसार ज्याने त्याने मनसोक्त आतिषबाजी करून घ्यायची.
मुलांचे फटाके उडवणे सुरू करून दिल्यावर त्याची थोडी मजा पाहून मोठी माणसे बाहेर पडायची. फटाके उडवणे झाल्यानंतर आम्ही त्यांना गाठत असू. बाजारात केलेली दिव्यांची सुंदर आरास पहात पहात ती डोळ्यांत साठवून घेत असू. बाजारपेठेतल्या दुकानदारांच्या पेढ्यांवर थाटांत लक्ष्मीपूजन झालेले असे. आमचा कसला व्यापार धंदा नसल्यामुळे घरातल्या पूजेत त्याच्या हिशोबाच्या चोपड्या वगैरे नसत. दुकानदारांच्या पूजेत त्यांना महत्वाचे स्थान असायचे. दुसरे दिवशी व्यापारउद्योगांचे नवे वर्ष सुरू होत असे. त्याआधी नव्या वह्यांची पूजा करून नवे वर्ष भरभराटीचे जावो, सगळ्या उलाढालीत नफाच नफा होवो अशी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करत. ओळखीचे दुकानदार आग्रहाने बोलावून आपल्या शेजारी गादीवर बसवून घेत आणि पानसुपारी व प्रसाद देत. नवीन कपडे यथेच्छ चुरगळून आणि मळवून पण अद्भुत वाटणारा अनुभव घेऊन आम्ही परतत असू.
. . . . . . .. . . (क्रमशः)

No comments: