Tuesday, October 28, 2008

आली दिवाळी - भाग २

परगांवाहून येणा-या घरातल्याच आणि पाहुणे मंडळींच्या आगमनापासून आनंदोत्सवाची सुरुवात झालेली असली आणि वसुबारस, धनतेरस वगैरे दिवस थोडेसे वॉर्म अप करून गेलेले असले तरी दिवाळीची अधिकृत सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नांवाच्या राक्षसाचा वध केला अशी कथा सांगतात, पण त्याचा आमच्या पहाटे उठून आंघोळ करण्याशी काय संबंध आहे हे कोडे मला लहानपणी पडायचे आणि त्याचे समर्पक उत्तर कधीच मिळाले नाही. देवदेवतांनी अवतार घेऊन अशा कित्येक असुरांचा नाश केल्याची उदाहरणे पुराणात आहेत, मग फक्त या नरकासुराच्या नांवाने आपण आंघोळ कशाला करायची? नरकासुराचा बादरायण संबंध नरकाशी म्हणजेच घाणीशी जोडला तर त्यात तथ्य दिसायला लागते. दिवाळीच्या आधी घरादाराची साफसफाई, रंगरंगोटी करण्याची प्रथा होती. त्यामुळे जुनाट अस्ताव्यस्त घरातले नेहमी उपयोगात न येणारे काने कोपरे, कपाटे, कोनाडे वगैरे सगळे या वेळी झाडले जात. त्यात सांचलेला कचरा काढून टाकला जाई. परिसराचीसुध्दा सफाई केली जाई, पावसाळ्यात उगवलेले गवत उपटून टाकून आणि उंदीर घुशींनी केलेली बिळे लिंपून सगळे आवार स्वच्छ केलेले असे. हे सगळे दिवाळीच्या आंत करायचे असल्यामुळे टाळाटाळ न करता ते वेळेवर पूर्ण करणे आवश्यक असायचे. ते होईपर्यंत दिवाळीचा दिवस उजाडायचाच. त्याची सुरुवात शरीराच्या स्वच्छतेने करणे सुसंगतच म्हणावे लागेल.
नरक चतुर्दशीच्या दिवशी झाडून सगळे जण भल्या पहाटे उठून बसत. त्या दिवशी अभ्यंगस्नान करण्यापूर्वी सर्वांगाला खोब-याचे सुगंधी तेल लावून चांगले मालिश करायची पध्दत होती. त्या काळात व्हॅनिशिंग क्रीम, कोल्ड क्रीम, मॉइश्चराइजर यासारखे शब्द ऐकूनसुध्दा माहीत नव्हते. या तेल लावण्यामुळे त्वचेला जो स्निग्धपणा मिळतो तो चांगला परिणामकारक असला पाहिजे. त्यामुळे थंडीची सुरुवात होतांना झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे त्वचेला जो रुक्षपणा येऊ शकतो तो टाळण्यासाठी वेगळे उपाय करायची गरज पडत नसावी. अंगाला तेल चोपडून घेतल्यानंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करायचे. त्यासाठी बंब होताच, त्याशिवाय पाण्याचे मोठे हंडे तापवून ठेवलेले असायचे. हे स्नान सूर्योदय होण्यापूर्वी करण्यासाठी घाई असायची. जो कोणी आळशीपणान किंवा चेंगटपणा करेल तो नरकात जाील अशी भीतीही दाखवली जायची. आंघोळ झाल्यानंतरसुध्दा उटण्याचा मंद सुवास येत रहायचा आणि मन प्रसन्न होत असे. त्यानंतर मोजकेच फटाकडे, फुलबाज्या वगैरे उडवायचे. कोणी अंगणात रांगोळ्या घालायला लागत. पण सर्वांचे सगळे लक्ष फराळाचे बोलावणे येण्याकडे लागलेले असे.
देवाची पूजा आणि नैवेद्य दाखवून झाला की फराळाला सुरुवात होत असे. यातले सारेच पदार्थ आधी तयार करून ठेवले असलेले असले तरी नैवेद्य दाखवून झाल्याखेरीज ते चाखून पहाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याची चंव पाहण्याची उत्कंठा सर्वांनाच असायची. लाडू, करंज्या, चिरोटे व अनरसे हे गोड पदार्थ आणि शेव, चिवडा, चकल्या व कडबोळी हे तिखटमिठाचे पदार्थ असायचेच. शंकरपाळ्यांच्या गोड आणि तिखटामिठाच्या अशा दोन्ही प्रकारच्या आवृत्या असत. लाडूमध्ये रवा, बेसन, संमिश्र असे प्रकार असत आणि त्यात पुन्हा पाकातले कडक आणि पिठीसाखर मिळवून केलेले ठिसूळ असे उपप्रकार असत. त्यातला एकादा प्रकार फराळात, दुसरा जेवणात,तिसरा बांधून देण्यसाठी वगैरे विभागणी होत असे. इतर पदार्थांमध्येसुध्दा अशीच विविधता असे.
खाण्याचे इतके प्रकार आणि पदार्थ असतांना मुलांना आणखी काय पाहिजे? "हरहर महादेव" करून त्यावर तुटून पडायचे. फराळ खातांखातांनाच मधून मधून "कडबोळी या वेळी छान खुसखुशीत झाली आहेत. ", "म्हणजे काय? माझी नेहमीच होतात. ", "चांगलं भरपूर मोहन घातलं तर कां नाही होणार?", "पण शेव थोडी कडकडीत राहिल्यासारखी वाटते. ", "तशी नसली तर तिचा चुरा होणार नाही का? मग तो भुगा कोण खाईल? ", "अनरसे थोडे चिवट वाटतात ना?", "अगं बाई, डब्याचं झाकण चुकून उघडंच राहिलं वाटतं. ", "ही हवा तर अशी आहे! सर्दावायला जरासुध्दा वेळ लागत नाही", "ते जाऊ दे, पण चंवीला किती मस्त झाले आहेत?", "ही करंजी दिसायला एवढी मोठी, पण फोडली की नुसती पोकळ! ", "तुला काय पुरणानं गच्च भरून पाहिजे?", "कडबोळी काय मस्त झाली आहेत?", "त्यात थोडा ओवा परतून घातला आहे. त्याने वेगळी चंवही येते आणि पचनालाही मदत होते " अशा प्रकारे फराळातल्या प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण होत फराळाचा कार्यक्रम सावकाशपणे चांगला रंगायचा.
. . . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः)

No comments: